रक्तदाते व्हा… एक बाटली देते चौघांना जीवदान..! | पुढारी

रक्तदाते व्हा... एक बाटली देते चौघांना जीवदान..!

कोल्हापूर, एकनाथ नाईक : रक्तदान केल्यामुळे अशक्तपणा येतो…शरीरात पुन्हा रक्त तयार होत नाही, असे अनेक गैरसमज गेल्या काही वर्षांत विविध माध्यमातून झालेल्या जनजागृतीमुळे मागे पडले आहेत. आता रक्तदान करून दुसर्‍याला जीवदान देण्यासाठी असंख्य रक्तदाते पुढे येत आहेत. रक्तविघटनानंतर रक्ताची एक बाटली चौघांना जीवदान देते.

रक्तदानामुळे गरजू व्यक्तीला जीवदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असे म्हटले जाते. रक्तदानामध्ये तरुणांचा सहभाग वाढत आहे. सर्वत्र रक्तदान शिबिरे घेतली जात असून, त्यांचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली यामुळे अनेक व्याधींना आमंत्रण मिळत आहे. डेंग्यूसह अन्य कारणांनी रुग्णांच्या प्लेटलेट कमी होत आहेत. अपघात, शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव यामुळे नियमित रक्ताची मागणी वाढलीआहे. त्यामुळे सामाजिक संघटना, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयांनी रक्तदान शिबिरांसाठी पुढे येण्याची गरज आहे.

रक्तदान कोणी करावे

18 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तीने रक्तदान करावे, रक्तदात्याचे वजन 50 किलोपेक्षा अधिक असावे, पुरुष रक्तदात्याचे हिमोग्लोबीन 12.5 टक्के असावे आणि महिलांमध्ये 11.5 टक्के असावे.

यांनी रक्तदान टाळावे

क्षयरोग, कावीळ, मलेरिया, एड्स , कॅन्सरग्रस्तांसह जुने आजार असणार्‍या व्यक्तींनी रक्तदान करू नये. मोठी शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनीदेखील रक्तदान करू नये. व्यसनी लोकांनी रक्तदान टाळावे.

रक्तदानाचे फायदे

कॅन्सर, हृदयरोग, रक्तदाब यावर नियंत्रण राहते. रक्ताची गरज भासते तेव्हा आर्थिक बचत होते. रक्तदानामुळे शरीरात नवीन रक्त तयार झाल्याने शरीर निरोगी राहते. रक्तदात्यांना कार्ड मिळते. त्यामुळे त्यांना गरजेवेळी मोफत रक्त मिळते.

या रक्तदात्यांनी सहकार्य करावे

ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह या रक्तगट असणार्‍या लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळे या रक्तगटाची टंचाई भासते. या गटाचे दाते रक्तदानासाठी सहसा पुढे येत नाहीत. या लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे. रक्तपेढीत आपला संपर्क नंबर द्यावा. कारण अशा गटाच्या रक्तदात्यांमुळे एखाद्याचा जीव वाचणार आहे.

बालिंगेचा ‘शतकवीर’ रक्तदाता

बालिंगा (ता. करवीर) येथील आनंद जाधव यांनी आतापर्यंत 118 वेळा रक्तदान करून गरजूंना जीवदान दिले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेऊन त्यांचा गैरव केला आहे. जाधव यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, बेळगाव येथे जाऊन गरजूंना रक्तदान केले आहे.

Back to top button