Kolhapur Ganeshotsav : दहापर्यंतच देखाव्यांची सक्ती का?.. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सवाल | पुढारी

Kolhapur Ganeshotsav : दहापर्यंतच देखाव्यांची सक्ती का?.. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सवाल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राजारामपुरी भागातील देखावे रात्री दहानंतर बंद करा, अशा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या सूचनेनेे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दहापर्यंतच देखाव्याची सक्ती का? मुंबईत आणि कोल्हापुरात वेगवेगळे नियम का, असा सवाल कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

मंडळांनी अहोरात्र परिश्रम घेऊन देखावे तयार केले आहेत. देखाव्यातून समाज प्रबोधन केले जात आहे. देखाव्याचे कायम आकर्षण ठरणार्‍या राजारामपुरीत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. राजारामपुरी बारावी गल्ली ते पहिली गल्ली या मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा व्यवसाय आहे. अशातच राजारामपुरी पोलिसांनी काही मंडळांना दहा वाजता देखावे बंद करा, असे सांगितले. त्यामुळे तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, काही मंडळांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत देखावे सुरू ठेवले. सोमवारी सकाळी याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात बैठक होणार होती. पण ती झाली नाही. त्यामुळे नेमके किती वाजेपर्यंत देखावे सुरू राहणार याबाबत चर्चा होऊशकली नाही. तरुण मंडळांनी देखावे पाहण्यासाठी वेळेची मर्यादा ठेवू नये, अशी मागणी केली आहे. राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाचे दुर्गेश लिंग्रस यांनी मुंबईत लालबागचा राजा दर्शनासाठी पहाटेपर्यंत खुला असतो. मग कोल्हापुरातच वेगळे नियम का, अशी विचारणा केली.

Back to top button