ए. एस. ट्रेडर्सच्या 32 संचालकांसह 25 एजंटांचीही बँक खाती गोठविली | पुढारी

ए. एस. ट्रेडर्सच्या 32 संचालकांसह 25 एजंटांचीही बँक खाती गोठविली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधीच्या घोटाळ्यातील बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न विविध कंपन्यांचा म्होरक्या तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग सुभेदारसह 32 संचालक आणि प्रमुख 25 एजंटाच्या विविध बँकांतील खाती गुरुवारी गोठविण्यात आली. सुभेदारने फरार काळात नवी मुंबई, वाशीतील आलिशान हॉटेल्स, लॉजेसवर कोट्यवधीची उधळण केल्याची माहितीही चौकशीत उघड झाली आहे.

जेरबंद केलेल्या कर सल्लागार साहेबराव सुबराव शेळके (रा. साने गुरुजी वसाहत) याने तीन वर्षांत 5 कोटी 30 लाखांची कमाई केली आहे, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्य संशयित सुभेदारला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र चौकशीत त्याचे असहकार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकांकडून तपशील येताच फसवणुकीची व्याप्ती स्पष्ट होईल

संशयित सुभेदारच्या नावे विविध बँकांमध्ये खाती असून त्यावर चार वर्षांत मोठ्या उलाढाली झाल्या आहेत. संबंधित तीन बँकांतील खातीही गोठविण्यात आली आहेत. खात्यावरील उलाढालीचा तपशीलही बँक व्यवस्थापनाकडून मागविण्यात येत आहे. तपशील उपलब्ध झाल्यानंतर फसवणुकीची व्याप्ती उघड होण्याची शक्यता आहे.

कर सल्लागाराचे अख्खे कुटुंब पसार

कर सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणारा शेळके याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. स्वत:सह पत्नी, संचालक असलेल्या मुलासह मुलगीही एजंट म्हणून कंपनीकडे कार्यरत होते. तीन वर्षांत त्याच्या नावे 5 कोटी 30 लाखांची कमाई जमा झाली आहे. शेळकेला अटक झाल्यानंतर त्याचे कुटुंब पसार झाले आहे, अशीही माहिती तपासाधिकार्‍यांनी दिली.

सुभेदारचे नवी मुंबईत वास्तव्य

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सुभेदारने कोल्हापुरातून पलायन केले होते. अटक टाळण्यासाठी नवी मुंबईसह वाशी येथील विविध हॉटेल्स व लॉजेसमध्ये त्याने वास्तव्य केल्याची माहिती उघड होत आहे. प्रत्येकवेळी दोन-तीन दिवसांनंतर ठिकाणे बदलत होता. 20 ते 22 दिवसांनंतर स्वत:कडील मोबाईल, सिमकार्डही बदलत होता, अशीही माहिती चौकशीतून निष्पन्न झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

आर्थिक वादातून खुन्नस !

जुलै-ऑगस्ट 2022 या काळात सुभेदारची प्रकृती बिघडल्याने शाहूपुरी येथील मुख्य कार्यालयाशी त्याचा संपर्क तुटला होता. या काळात व्यवहाराची सारी सूत्रे अमर चौगुले, बाबू हजारे, भिकाजी कुंभार, अभिजित शेळके, विजय जोतिराम पाटील यांनी हाती घेतली होती. आर्थिक वादातून त्याच्यात खुन्नस निर्माण झाली होती, असेही सांगण्यात आले.

Back to top button