ए. एस. ट्रेडर्स म्होरक्याच्या घटस्फोटित पत्नीकडून 50 लाखांचे दागिने जप्त | पुढारी

ए. एस. ट्रेडर्स म्होरक्याच्या घटस्फोटित पत्नीकडून 50 लाखांचे दागिने जप्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र व अन्य राज्यांतील लाखाहून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स तसेच संलग्न कंपन्यांचा म्होरक्या लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. दत्तनगर, पलूस, सांगली) याच्या घटस्फोटित पत्नीकडून आर्थिक गुन्हे शाखेने 75 तोळे दागिने, अडीच लाखांचे हिरे, असा 50 लाखांचा मुद्देमाल शनिवारी हस्तगत केला.

कंपनीच्या फरारी संचालक व एजंटांसह नातेवाईकांच्या नावावर असलेल्या आठ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांचा चौकशीत छडा लागला आहे. संबंधित मालमत्तांवर टाच आणण्याची न्यायालयीन प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, असेही आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

म्होरक्यासह संचालक पसार

महाराष्ट्रासह सात राज्यांत व्याप्ती असलेल्या शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न विविध कंपन्यांनी कमी काळात दामदुप्पट परतावा देण्याचा बहाणा करून सुमारे एक लाखापेक्षा जादा गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटींचा गंडा घालून गाशा गुंडाळला आहे. म्होरक्या लोहितसिंग सुभेदारसह 31 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संचालकांसह एजंट पसार झाले आहेत.

31 पैकी 7 जणांना अटक याप्रकरणी आजवर 31 पैकी 7 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संशयित सुभेदारच्या अटकेसाठी पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.

घटस्फोटित पत्नीवर प्रश्नांचा भडिमार

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाधिकारी स्वाती गायकवाड यांनी गेल्या आठवड्यापासून मुख्य संशयित सुभेदार याच्या घटस्फोटित पत्नीकडे चौकशीचा ससेमिरा लावला होता. प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता. सुभेदारने फिर्यादी रोहित ओतारी (रा. शुक्रवार पेठ) यांच्यासह इतर गुंतवणूकदार, साक्षीदार यांची फसवणूक करून जमा केलेल्या रकमेतून खरेदी केलेल्या 750 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे हिर्‍याचे दागिने, असा 50 लाखांचा मुद्देमाल त्याच्या घटस्फोटित पत्नीकडून हस्तगत करण्यात आल्याचे तपासाधिकारी स्वाती गायकवाड यांनी सांगितले.

तीन कोटी 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आजवर अटक केलेल्या संशयितांकडून दागिने, चारचाकी, दुचाकी वाहने, शेतजमीन, फ्लॅट, प्लॉट, बँक खात्यातील रकमा, असा तीन कोटी 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून आठ कोटींच्या स्थावर मालमत्तांचा छडा लावण्यात यश आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button