राज्यात १,३८० टीएमसी पाण्याचा दुष्काळ! | पुढारी

राज्यात १,३८० टीएमसी पाण्याचा दुष्काळ!

कोल्हापूर; सुनील कदम : कोयना, उजनीसह राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. पाऊसही गायब झालेला आहे. त्यामुळे राज्यात आजघडीला जवळपास 1,380 टीएमसी पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे. पाणीटंचाईच्या या डोळे विस्फारणार्‍या आकडेवारीमुळे संभाव्य भीषण दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. ही राज्याच्या द़ृष्टीने धोक्याची घंटा आहे.

नजीकच्या काळात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर राज्यावर पाणीबाणीचे चटके बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. टाटा ऊर्जा संशोधन संस्थेने 2000 साली केलेल्या अभ्यासातून असे निश्चित झाले आहे की, देशात वार्षिक एकूण 39,623.06 टीएमसी एवढी पाण्याची उपलब्धता आहे. यापैकी 24,367 टीएमसी पाणी भूपृष्ठावर, तर 15,255 टीएमसी पाणी भूपृष्ठाखाली उपलब्ध होत असते. देशात एकूण वार्षिक उपलब्ध पाण्यापैकी 5,158 टीएमसी पाण्याची उपलब्धता एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यापैकी 4,973 टीएमसी इतके पाणी महाराष्ट्राच्या वाट्याचे आहे. सर्वप्रकारच्या पाण्याच्या वापराचे प्रमाण 2,875 टीएमसी इतके आहे. वरील आकडेवारीवरून कुणीही असा निष्कर्ष काढू शकेल की, राज्याकडे अजून 2,098 टीएमसी जादा पाणी उपलब्ध आहे; मात्र वस्तुस्थिती तशी नाही. कारण, कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे जवळपास 2,300 टीएमसी पाणी राज्याच्या फारशा कामाला येत नाही.

राज्यात सध्या मोठी, मध्यम व लहान अशी मिळून एकूण 2,994 धरणे आहेत. या सर्व धरणांची पाणी साठवण क्षमता 1,705 टीएमसी इतकी आहे. मात्र, यंदा पावसाने दगा दिल्यामुळे ऑगस्टअखेर या धरणांमध्ये 1,191 टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे. धरणांमधील पाणीसाठा 35 टक्क्यांनी म्हणजेच 514 टीएमसीने कमी झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये राज्यातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठा होता. यंदा तो 65 टक्के आहे.

राज्यात भूपृष्ठावरील उपलब्ध असणार्‍या पाण्याचे प्रमाण 3,842 टीएमसी इतके आहे. यापैकी धरणांमधील 1,705 टीएमसी पाणीसाठा वजा केला, तर 2,137 टीएमसी पाणी हे राज्यातील छोटे-मोठे तलाव, लघू पाटबंधारे तलाव, पाझर तलाव आणि प्रामुख्याने राज्यातील नद्यांच्या पात्रातून उपलब्ध होते. जी अवस्था धरणांतील पाण्याची आहे, सध्या तीच अवस्था राज्यातील तलाव आणि नदीपात्रांची आहे. पावसाअभावी तिथेही जवळपास 30 टक्के पाण्याची कमतरता जाणवत आहे. टीएमसीत सांगायचे, तर भूपृष्ठावरील उपलब्ध पाण्यातही जवळपास 641 टीएमसीची कमतरता जाणवणार आहे.

भूजलातील पाणी उपसण्याच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात वर्षाकाठी तब्बल 753 टीएमसी इतके पाणी भूगर्भातून उपसले जाते. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे भूगर्भातील पाण्याची उपलब्धताही साधारणत: 30 टक्के म्हणजे 225 टीएमसीने कमी होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

राज्यातील पाण्याचे उपलब्धतेचे वेगवेगळे स्रोत आणि आणि त्यांची सध्याची स्थिती विचारात घेता, यंदा राज्याला जवळपास 1,380 टीएमसीची कमतरता जाणवेल, अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

यंदा जाणवत असलेली पाण्याची कमतरता

धरणांमधील पाणीसाठा : 514 टीएमसी
भूपृष्ठावरील पाणी : 641 टीएमसी
भूगर्भातील पाणी : 225 टीएमसी
परराज्यांतून मिळणारे पाणीही घटणे शक्य
एकूण कमतरता : 1,380 टीएमसी

पाण्याचा वार्षिक वापर

घरगुती वापर : 208 टीएमसी
औद्योगिक वापर : 66.82 टीएमसी
सिंचनासाठी : 2,096 टीएमसी
परराज्यांना द्यायचे पाणी : 503 टीएमसी
एकूण वापर : 2,875 टीएमसी

राज्यातील पाण्याची वार्षिक उपलब्धता

भूपृष्ठावरील पाणी : 3,842 टीएमसी
परराज्यांतून मिळणारे पाणी : 378 टीएमसी
भूजलाची उपलब्धता : 753 टीएमसी
पाण्याचे पुनर्निर्माण : 185 टीएमसी
एकूण उपलब्धता : 5,158 टीएमसी

Back to top button