रक्षाबंधनाच्या दिवशी भावावर काळाचा घाला! राखी बांधण्याचे दोन्ही बहिणींचे स्वप्न राहिले अधुरेच | पुढारी

रक्षाबंधनाच्या दिवशी भावावर काळाचा घाला! राखी बांधण्याचे दोन्ही बहिणींचे स्वप्न राहिले अधुरेच

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : तिटवे येथील घारे कुंटुंबातील दोन वर्षाचा ‘आरोहन’ आजारी होता. त्यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ‘आरोही’ व ‘ओवी’ या दोन चिमुकल्या बहिणींनी रुग्णालयात भावाला पहाण्याचा हट्ट वडिलांकडे धरला. पण वडिलांनी तुमचा भाऊ ‘अरोहन’ रक्षाबंधनाला सकाळी येणार आहे. असे सांगून दोघींची समजूत काढली. सकाळी लवकर उठून औक्षण करून भावाला राखी बांधायची. या आनंदात रात्री त्या दोघी झोपी गेल्या. रक्षाबंधनाचा दिवस उजाडला… पण रक्षाबंधनाची त्यांची सकाळ दुःखाने काळवंटून गेल्याचा प्रत्यय आला. ‘आरोहन’ चा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. कुटूंबाने केलेल्या आक्रोशात रक्षाबंधनादिवशीच दोन बहिणींची ‘राखी’ थिजून गेली. अन्…राखी बांधण्याचे दोन्ही बहिणीचे स्वप्न अधुरेच राहिले !

तिटवे येथील संदीप घारे व जयश्री घारे यांना ‘आरोही’ व ‘ओवी’ या दोन कन्येंच्या पाठीवर दोन वर्षापूर्वी ‘आरोहन’ या चिमुकल्याचा जन्म झाला. त्याचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला. कुटूंब मोठे असल्यामुळे गोकुळासारखं घर भरून गेले होते. काय झालं कुणास ठाऊक पण दैव फिरले. हसऱ्या खेळत्या ‘आरोहन’ ला अचानक शारिरिक त्रास सुरु झाला. वैद्यकीय उपचार सुरू असताना शेवटी एका बालरोगतज्ञाला निदान लागले आणि समजले की त्याला ‘ब्रेन ट्युमर’ झाला आहे. या कष्टकरी कुटूंबाने बाळाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

मुंबईतील हॉस्पिटलमध्ये बाळाला दाखल केले. सर्व तपासण्या केल्या आणि गेल्या दि. २२ एप्रिल रोजी त्याची ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया केली. तेथे दोन महिने राहून त्याच्या आई-वडिलांनी त्याची काळजी घेतली. पण त्यामध्ये दुर्दैवाने बाळाची दृष्टी गेली.

घरी आल्यानंतर त्याची काळजी घेत औषधोपचार सुरु ठेवले. गेली चार महिने तो फक्त आवाजावरून माणसं ओळखत होता. पण मंगळवारी (दि. २९) अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला भोगावती येथील बालरोग तज्ञाकडे दाखल केले. सुरुवातीला उपचारालाही त्याने चांगला प्रतिसाद दिला. घरी असलेल्या दोन लहान बहिणींनी भावाला दवाखान्यात पहाण्यासाठी नेण्याचा वडीलांकडे आग्रह धरला. तेंव्हा वडिलांना मुलींना समजावत उद्या रक्षाबंधन आहे.

मी आरोहनला सकाळी घरी घेवून येतो. तुम्ही त्याला राखी बांधून त्याचे औक्षण करा. मुलींनी वडिलांचे म्हणणे ऐकून दवाखान्यात जाण्याचा हट्ट सोडला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. रात्री चिमुकल्या आरोहनची तब्बेत अचानक बिघडली आणि पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.

घरी रक्षाबंधनासाठी वाट पहात बसलेल्या बहिनींना भावाच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली. जणू बहिणींची राखी थिजून गेली. कुटुंबियांनी फोडलेला टाहो सर्वांची ह्दय पिळवटून टाकणारा होता. अन्…राखी बांधण्याचे त्या दोन्ही बहिणींचे स्वप्न अधुरेच राहिले !

कपड्यांची घडी उलगडलीच नाही!

‘आरोहन’ च्या दुसरा वाढदिवसानिमित्त त्याच्या नाधवडे येथील आत्यांने भाच्याला कपडे घेतली होती. पण त्या दिवशी जोराचा पाऊस असल्याने इच्छा असूनही त्याची आत्या वाढदिवसाला येवू शकली नाही. भाच्याला हौसेने घेतलेली कपड्यांची घडी उलगडलीच नाही ! याची सल मनात मात्र कायमची राहिली.

हेही वाचा;

Back to top button