Kolhapur News | पंचगंगेत यंदाही गणेशमूर्ती विसर्जनास बंदी | पुढारी

Kolhapur News | पंचगंगेत यंदाही गणेशमूर्ती विसर्जनास बंदी

सतीश सरीकर

कोल्हापूर : नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी यंदाही पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने त्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. अनंत चतुर्दशीदिवशी निघणारी विसर्जन मिरवणूक गंगावेसमधून पुढे रंकाळामार्गे इराणी खणीकडे नेण्यात येणार आहे. त्यासाठी गंगावेस येथे बॅरिकेडस् लावून मार्ग बंद करण्यात येणार आहे. (Kolhapur News)

पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत

तसेच पंचगंगा घाटाकडे जाणारा रस्ताही बॅरिकेडस् लावून अडविण्यात येणार आहे. एकही गणेशमूर्ती पंचगंगा घाटावरून नदीत विसर्जित होऊ नये यासाठी कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. सन 2020 आणि सन 2021 मध्ये कोरोनामुळे पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करू दिले नव्हते. 2022 म्हणजेच गेल्यावर्षी पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी परवानगी मिळणार का, याकडे तरुण मंडळे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या वतीने पंचगंगा घाटाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडस् लावून अडविण्यात आले होते. त्यामुळे गेल्यावर्षी एकही गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन झाले नाही.

तरुण मंडळांनीही महापालिकेला सहकार्य केले. लहान मूर्ती आणि 21 फुटापर्यंतच्या उंच मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी सुद्धा महापालिकेच्या वतीने इराणी खणीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विसर्जन मार्गावर आतापासून पॅचवर्कसह इतर कामे करण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

काही वर्षांपासून पंचगंगेत लहान व मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. तब्बल एक हजारहून जास्त टन प्लास्टर आणि त्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल मिश्रित तीन हजार लिटर रंग दरवर्षी नदीत मिसळत होते. त्यामुळे नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत होते. त्यामुळे नदीतील जलचरांना धोका निर्माण होत होता. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत होता. न्यायालय आणि केंद्र शासनाने पाणी प्रदूषणाबाबत कठोर अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गेले तीन वर्षे पंचगंगेत मूर्ती विसर्जन न झाल्याने मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. (Kolhapur News)

Back to top button