kolhapur news | गजापूरात बिबट्याकडून दुभत्या गायीचा फडशा | पुढारी

kolhapur news | गजापूरात बिबट्याकडून दुभत्या गायीचा फडशा

विशाळगड,पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील गजापूर पैकी शिंपीपेठ येथे बिबट्याने गायीला फरकटत नेऊन एका गायीचा  फडशा पाडला. आज (दि.२५) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने गजापूर, मुसलमानवाडी, दिवाणबाग, साईनाथ पेठे, तसेच विशाळगड परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Vishalgad)

kolhapur news : बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार

याबाबत सविस्तर माहिती अशी, गजापूर पैकी शिंपीपेठ येथील रोहिणी चंद्रकांत बारटक्के यांची गाय घराशेजारी असणाऱ्या गोठ्यात होती. रात्रीच्या सुमारास गाय गोठ्यातून बाहेर आली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. सुमारे ३० फूट अंतरावर फरफटत नेऊन विशाळगड रस्त्यालगत फडशा पाडला. काही दिवसांपूर्वीच ती व्यायली होती. दुभत्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवून तिचा फडशा पाडल्याने बारटक्के कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची परिस्थिती बेताची असून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी गजापूर पैकी वाणीपेठ, मुसलमानवाडी, दिवाणबाग, बौद्धवाडी, हाप्पेवाडी या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आता तो भरवस्तीत घुसू लागल्याचे चित्र आहे.

शेतकरी धास्तावले

यापूर्वी हाप्पेवाडी येथील दिनेश अर्जुन हाप्पे यांची गाय व दिवाणबाग येथील दत्ताराम रांबाडे यांचे रेडकूही ठार केले होते. विशेषतः गायींना त्याने लक्ष्य केले आहे. वर्षभरात आजअखेर सात गायीं, गाढव आणि रेडकू बिबट्याने फस्त केले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे. भीतीपोटी रात्रीच्यावेळी बाहेर जायला शेतकरी घाबरू लागला आहे. बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत संबंधितांनी वन विभागाला कळवले आहे. वनक्षेत्रपाल पेंढाखळे सुषमा जाधव, वनपाल नितीन नलवडे (येळवन जुगाई), वनरक्षक एन डी नलवडे (शेंबवणे), हंगामी वन मजूर श्रीधर कांबळे, महादेव कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला. हा हल्ला बिबट्याने केल्याचे निष्पन्न झाले

पशुधन धोक्यात

अचानक बिबट्याचा वावर व हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांसह लहानमुलांत भीतीचे वातावरण आहे. परिसरात आजअखेर सात गायी, रेडकू व गाढव हे पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही. त्यामुळे गजापुराचे पशुधनही धोक्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button