अवीट गीतांची ‘सोनेरी चंदेरी पहाट’ संस्मरणीय | पुढारी

अवीट गीतांची ‘सोनेरी चंदेरी पहाट’ संस्मरणीय

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गीत-संगीत, किस्से-आठवणी, अभिवाचन, शास्त्रीय गायन अशा विविध संकल्पनांवर दै ‘पुढारी’ आणि मनीषा निश्चल्स महक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोनेरी चंदेरी पहाट’ या कार्यक्रमाने कोल्हापूरकरांची मंगळवारची सकाळ संस्मरणीय ठरली. भाव व भक्तिगीतांना वन्समोअर देत रसिकांनी दिवाळीचे उत्साहात स्वागत केले.

गेल्या वर्षीच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट होते. सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंधांची चौकट होती. त्यामुळे सण साजरा करण्याची कुणाचीच मानसिकता नव्हती; मात्र यंदाचे चित्र वेगळे आहे. कोरोनामुळे आलेले नैराश्य, दुःख बाजूला सारून पुन्हा एकदा नव्या उमेदीचा, आशा-आकांक्षाचा दिवा पेटवण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. शासनाने लॉकडाऊन अटी केल्याने प्रथमच आलेल्या दिवाळीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. मंगळवारी पहाटे केशवराव भोसले नाट्यगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. कवी मंगेश पाडगावकर, शांता शेळके, अरुण दाते, श्रीनिवास खळे, यशवंत देव यांनी अजरामर केलेली गाणी यावेळी सादर करण्यात आली.

भावसंगीताचे किमयागार व सुवर्णकाळाचे शिल्पकार कवी मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते, कवयित्री शांता शेळके, संगीतकार श्रीनिवास खळे व संगीतकार यशवंत देव या पंचतारांकित गंधर्वांनी अजरामर केलेली गीते ‘सोनेरी चंदेरी’ दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांनी अनुभवली. मंगेश पाडगावकर, अरुण दाते यांच्या निवडक कविता, गीते तसेच पाडगावकर आणि अरुण दाते यांच्या आयुष्यातील रंजक किस्से अंजली पाडगावकर-कुलकर्णी आणि अतुल अरुण दाते यांच्याकडून ऐकताना प्रत्येक गाण्यामागचा भाव रसिकांना उलगडत गेला.

मनीषा निश्चल यांच्यासह जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरूनी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘गोरी गोरी पान’, ‘काय बाई सांगू’ अशी अवीट गाणी गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. यश भंडारे, मंदार देव, अपूर्व द्रविड, जीवन कुलकर्णी, रोहन वनगे यांनी वाद्यांवर साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनीषा निश्चल, अंजली पाडगावकर, अतुल दाते, नाट्य वितरक आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन उपस्थित होते.

…भाव-भक्तिगीतांना वन्समोअर

कोरोनाच्या अटी शिथिल झाल्यानंतर भाव-भक्तिगीतांचा पहिलाच कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात सादर करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रम बंदच होते. दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित केलेल्या सोनेरी चंदेरी पहाट कार्यक्रमाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता होती. कोव्हिड नियमांचे पालन करून रसिकांना प्रवेश देण्यात आला. भाव व भक्तिगीतांचे शब्द कानावर पडण्यासाठी रसिकांचे कानही आतुरले होते. कार्यक्रमात सादर झालेल्या अनेक गीतांना वन्समोअर देत रसिकांची सांस्कृतिक भूक तृप्त झाल्याची अनुभूती आली.

Back to top button