चंद्रकांत पाटील म्हणाले, राजीनामा देऊन मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणाले, राजीनामा देऊन मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1200 कोटींची मिळकत सील केल्याचे वृत्त कानी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘ईडी’ने अटक केली. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहेत. भ्रष्ट मंत्र्यांंसोबत काम करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेला धरून मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.

आ. पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांची मिळून 1200 कोटी रुपयांची मालमत्ता ईडी आणि आयकर विभागाने सील केल्याचे वृत्त आहे. या माहितीची खातरजमा करत आहे. अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर कारवाई होऊ शकते. काहीजण जात्यात आहेत तर काही जण सुपात आहेत. एका मंत्र्यावर ‘ईडी’ने कारवाई केली तर एका मंत्र्यांच्या जावयाचे दीड हजार कोटी रुपयांचे कंत्राट रद्द झाले. अन्य एका मंत्र्यांच्या मालकीची मालमत्ता सील केल्याचे वृत्त आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेमुळे कायद्यासमोर सगळे समान आहेत हे स्पष्ट झाले. महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्र्यांवर अटकेची कारवाई होत असेल तर राज्यातील या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतीक अधिकारनाही.

देवेंद्र हवेत वार करत नाहीत

आ. पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कधीही हवेत वार करत नाहीत. पुरावा हाती असल्याशिवाय ते आरोप करत नाहीत. हे वाझे प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यासंबंधी त्यांनी केलेला आरोपातही तथ्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना मैं खाऊंगा, ना मैं खाने दुँगा’ या पद्धतीच्या कामकाजामुळे भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच कोणत्याही पक्षाच्या भ्रष्ट मंडळींची सुटका नाही.

आता बघा, मग बघा कशाला?

संजय राऊत यांचे चलो दिल्ली याला काही अर्थ नाही. कोणी चंद्रावर जाऊ म्हटले तर त्याला कोण अडवणार. संजय राऊत हे काहीवेळा आता बघा, मग बघा असे म्हणत असतात. एवढ्या मोठ्या राज्याची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात आहे. मग बघा..बघा म्हणत वाट कसली पाहता. एक माजी गृहमंत्री आत गेला असला तरी दुसरा गृहमंत्री आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमातून इशारा देण्यापेक्षा थेट कारवाई करावी, असेही आ. चंद्रकांत पाटील म्हणाले.

Back to top button