माझ्यावर आरोप करण्यासाठी महिलेला गुंड तेलनाडेने १५ कोटींची सुपारी दिली : प्रकाश आवाडे | पुढारी

माझ्यावर आरोप करण्यासाठी महिलेला गुंड तेलनाडेने १५ कोटींची सुपारी दिली : प्रकाश आवाडे

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी नगर परिषद आणि महानगरपालिकेत झालेल्या भ—ष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणत असल्याचे पाहून एका महिलेला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी 15 कोटी रुपयांची सुपारी माजी नगरसेवक तथा दुहेरी ‘मोका’अंतर्गत कारवाई झालेला गुंड संजय तेलनाडे याने दिल्याचा खळबळजनक आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेत केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे आ. आवाडे यांनी सांगितले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी महापालिकेतील विकासकामांतील गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या पार्श्वभूमीवर आ. आवाडे यांनी बुधवारी अधिवेशनात महापालिकेतील विविध विकासकामांतील गैरव्यवहारांबाबत लक्षवेधी मांडली. या संपूर्ण गैरव्यवहाराच्या प्रकरणात माजी नगरसेवक संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ सुनील तेलनाडे यांचेच रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप आ. आवाडे यांनी केला. संजय तेलनाडे हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर दुहेरी ‘मोका’अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दोन वर्षे तो फरार होता. तो महापालिकेतील कोणत्याही खात्यातील टेंडर अन्य कोणाला भरू देत नाही. सगळे मक्तेदार त्याचे पगारी नोकर असून, सर्व टेंडर दमदाटी करून तेलनाडे स्वत:च घेतो. तेलनाडे याला सोडविण्यासाठीच त्याला अटक करण्यात आली आणि कोणाच्या वशिल्याने त्याला सोडण्यात आले, असा प्रश्नही आ. आवाडे यांनी उपस्थित केला.

महानगरपालिकेतील गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढून त्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवत असल्याचे पाहून संजय तेलनाडे याने काही महिलांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप करत गुन्हे दाखल करण्यासाठी 15 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप केला. यासंदर्भात संबंधित महिलेचे पत्र आणि त्यावर माझे कव्हरिंग लेटर देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे आ. आवाडे यांनी सांगितले.

महानगरपालिकेतील गैरव्यवहारासह गंभीर प्रकरणे मी उकरून काढून आवाज उठवत असल्याचे पाहून गुंडाची तारांबळ उडाली आहे. तेलनाडे याच्या कामकाजाची सखोल चौकशी होण्याची मागणी केली असून, त्याच्यावर दाखल गुन्ह्यांची संपूर्ण माहिती व रेकॉर्ड मी दिलेले आहे, त्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. आवाडे यांनी यावेळी केली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली असल्याचे आ. आवाडे यांनी सांगितले.

Back to top button