कोल्हापूर : १४ धरण क्षेत्रात अतिवृष्टी; 49 बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूर : १४ धरण क्षेत्रात अतिवृष्टी; 49 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी सर्वत्र धुवाँधार पाऊस झाला. दिवसभर पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातील प्रमुख पंधरा धरणांपैकी तब्बल 14 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. पाटगाव धरण परिसरात विक्रमी 295 मि. मी. पाऊस झाला. पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरू असून जिल्ह्यातील 49 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सुमारे दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभर पाऊस नुसता कोसळत होता. सकाळी काही वेळ घेतलेल्या विश्रांतीनंतर पावसाची दिवसभर संततधार सुरू होती. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातही दिवसभर दमदार पाऊस सुरू होता. पावसाने नद्या, ओढे आता दुथडी भरून वाहू लागले असून पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

शहरात पावसाने दाणादाण

शहरात पावसाने दाणादाण उडाली. शहराच्या बहुतांश भागांत वाहतुकीची कोंडी होत होती. पावसाने एरव्ही दोन-तीन मिनिटे लागणारे अंतर कापण्यासाठी बुधवारी आठ ते दहा मिनिटांचा कालावधी लागत होता. ताराराणी चौक ते मध्यवर्ती बसस्थानक, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक ते आईसाहेब महाराज पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी आदी मार्गांवर संथ गतीने वाहने पुढे सरकत होती. पावसाने शाळा-महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयांतील उपस्थितीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी तुलनेने गर्दी कमी होती. पावसाचा परिणाम केएमटी आणि रिक्षा वाहतुकीवरही झाला. केएमटी आणि रिक्षांनाही दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी होती. काही रिक्षा थांबे मोकळे पडलेलेही चित्र होते. पावसाने शहराच्या अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले. दुपारनंतर पाण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. परीख पुलाखालीही काही प्रमाणात पाणी साचले होते. सीपीआर चौक, जयंती नाला पूल आदी ठिकाणीही पाणी साचले होते. भाजी मंडई, व्यापारी पेठांतही काहीसा परिणाम झाला.

24 तासांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यातील प्रमुख 15 पैकी 14 धरण क्षेत्रांत बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. पाटगाव, घटप्रभा परिसरात दहा इंचापेक्षा जादा पाऊस झाला. सात धरण क्षेत्रात 100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला. राधानगरीत 111, तुळशीत 149, कुंभीत 181, चिकोत्रात 128, चित्रीत 113, जांबरेत 139, तर कोदेत 173 मि. मी. पाऊस झाला. वारणा धरण क्षेत्रात 67, दूधगंगा परिसरात 95, कासारीत 99, कडवीत 98, तर जंगमहट्टी परिसरात 72 मि.मी. पाऊस झाला. आंबेओहळमध्ये 54 मि.मी.पावसाची नोंद झाली.

गगनबावडा, चंदगड तालुक्यांत धुवाँधार

जिल्ह्यात बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 42.2 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली. गगनबावड्यात 98.1 मि.मी., तर चंदगडमध्ये 73.4 मि.मी.पाऊस झाला. आजर्‍यात 64 मि.मी., भुदरगडमध्ये 63.5 मि.मी., राधानगरीत 47.8 मि.मी., शाहूवाडीत 47.2 मि.मी., पन्हाळ्यात 44.7 मि.मी., कागल आणि गडहिंग्लजमध्ये प्रत्येकी 35.3 मि.मी., करवीरमध्ये 34 मि.मी., हातकणंगलेत 17 मि.मी., तर शिरोळ तालुक्यात 15.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.

Back to top button