राज्यातील साखर हंगाम यंदाही लांबणार | पुढारी

राज्यातील साखर हंगाम यंदाही लांबणार

कोल्हापूर ; सुनील कदम : उसाची प्रचंड उपलब्धता, एफआरपीवरून सुरू असलेले शेतकरी संघटनांचे आंदोलन, काही कारखान्यांना गाळप परवाना मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणी आणि तोडणी मजूर येण्यास होत असलेला विलंब आदी कारणांनी यंदाही साखर हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत 19 कारखाने सुरू झाले आहेत. महिनाअखेरपर्यंत 60 कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यात यंदा 10.67 लाख हेक्टर इतके उसाचे क्षेत्र आहे. यातून जवळपास 11 कोटी टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. यंदा सहकारी आणि खासगी प्रत्येकी 100 असे 200 कारखाने हंगाम घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्यावर्षी एकूण 190 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यापैकी 154 कारखान्यांनी एफआरपीनुसार बिले दिली, तर 36 कारखान्यांकडे अजूनही एफआरपीची शिल्लक येणे बाकी आहे.

त्यासाठी विविध शेतकरी संघटनांची आंदोलने सुरू आहेत. परिणामी, एफआरपीची रक्कम थकविल्यासह अन्य कारणांवरून अशा कारखान्यांना गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. आजपर्यंत केवळ 128 कारखान्यांनाच गाळप परवाना मिळाला आहे. हंगामाच्या तयारीतील अन्य कारखान्यांपुढे गाळप परवान्यासह इतरही अडचणी आहेत.

11 कोटी टन उसाची उपलब्धता आणि 200 कारखान्यांनी केलेली गाळपाची सिद्धता विचारात घेता प्रत्येक कारखान्याने पूर्ण क्षमतेने सरासरी 5.50 लाख टनाचे गाळप केले, तरी राज्यातील सगळा ऊस संपायला एप्रिलअखेर लागण्याची शक्यता आहे. मात्र, कारखान्यांच्या वापर क्षमतेबद्दल कृषी मूल्य आयोगानेच यंदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुढल्याच आठवड्यात दिवाळी असल्यामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने ऊसतोडणी मजूर आलेले नाहीत. दिवाळीनंतर तोडणी मजुरांच्या टोळ्या येतील. यामुळे हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी नोव्हेंबरचा दुसरा-तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील उसाचे एकूण क्षेत्र 10.67 लाख हेक्टर
उसाची एकूण उपलब्धता 11 कोटी मेट्रिक टन
200 कारखाने गाळप हंगामाच्या तयारीत
128 कारखान्यांनाच आजअखेर गाळप परवाना
अद्यापपर्यंत केवळ एकोणीस कारखाने चालू
दिवाळीनंतर हंगाम पूर्ण क्षमतेने होणार चालू
एप्रिलअखेर किंवा त्यापुढे साखर हंगाम चालण्याचा अंदाज
एफआरपीवरून कारखानदा-शेतकरी संघर्ष यंदाही कायम

राज्यातील 11 कोटी मेट्रिक टन उसाची उपलब्धता विचारात घेता यंदा 15 एप्रिलपर्यंत साखर हंगाम चालेल, असा अंदाज आहे. राज्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण 200 साखर कारखाने यंदाचा हंगाम घेण्यासाठी सज्ज आहेत. काही साखर कारखाने सध्या चालू झाले असून, ऑक्टोबरअखेर आणखी 60 साखर कारखाने सुरू होतील. साधारणत: दिवाळीनंतर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.
– जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Back to top button