कोल्हापूर : शिक्षण सहसंचालक कठरेंसह तिघांना लाच घेताना पकडले | पुढारी

कोल्हापूर : शिक्षण सहसंचालक कठरेंसह तिघांना लाच घेताना पकडले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कठरे (वय 46, रा. अंबाई डिफेन्स, राऊत कॉलनी, कोल्हापूर), कनिष्ठ लिपिक अनिल जोंग (34, रा. राशिवडे) आणि स्टेनो प्रवीण शिवाजी गुरव (32, रा. पीरवाडी, ता. करवीर) या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. राजाराम कॉलेजच्या आवारातील शिक्षण सहसंचालक कार्यालयातच ही कारवाई झाली. कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण सहसंचालक कार्यालयावर झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

डॉ. हेमंत कठरे यांच्याकडे शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. डॉ. कठरे हे राजाराम महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडे 4 मे 2023 रोजी सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. कठरे यांनी 14 जुलै 2021 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीतही शिक्षण सहसंचालकपदाचा कार्यभार सांभाळला होता. मार्च-एप्रिल 2023 मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध सिनिअर महाविद्यालयांत प्राध्यापक भरती झाली होती. या भरती प्रकरणात लाखो रुपयांची लाच घेतल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या प्रक्रियेवर योग्य पर्यवेक्षकीय नियंत्रण नसल्याचा आक्षेप ठेवत तत्कालीन शिक्षण सहसंचालक राजेसाहेब मारडकर यांची अन्यत्र बदली केली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. कठरे यांच्याकडे सोपविला होता.

सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर या संस्थेअंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणार्‍या दोन वेगवेगळ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेसकरिता आवश्यक त्या सोयीसुविधा आहेत किंवा कसे याची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी कठरे यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे या संस्थेचे अध्यक्ष अनिल सुभाष माने (रा. कासेगाव) यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार बुधवारी हा सापळा रचण्यात आला होता.

संबंधितांमध्ये झालेल्या तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. बुधवारी तक्रारदाराकडून तीस हजार रुपये स्वीकारताना कारवाई झाली. पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, हेड कॉन्स्टेबल प्रकाश भंडारे, विकास माने, सुनील घोसाळकर, पोलिस कॉन्स्टेबल रुपेश माने, मयूर देसाई, संदीप पवार, उदय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button