कोल्हापूर : धरण पाणीसाठ्यात केवळ 1.33 टीएमसी वाढ | पुढारी

कोल्हापूर : धरण पाणीसाठ्यात केवळ 1.33 टीएमसी वाढ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांत प्रमुख 15 धरणांत केवळ 1.33 टीएमसी पाणी वाढले आहे. या धरणांत आजअखेर एकूण 20.93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या एकूण क्षमतेच्या 22 टक्केच पाणीसाठा झाला आहे. यामुळे धरणे उशिरा भरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या केवळ 25 टक्के पाऊस झाला. अखेरच्या काही दिवसांत पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाचा म्हणावा तसा जोर वाढलेला नाही. यामुळे नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत संथ वाढ सुरू आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचगंगा दुथडी भरून वाहते. यावर्षी अद्याप पंचगंगेची पातळी 12 फुटांवर गेलेली नाही. बहुतांशी सर्वच नद्यांची अशीच काहीशी परिस्थिती आहे.

जिल्ह्यात 22 जूनपर्यंत धरणांत 19.6 टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी (दि. 1) तो 20.93 टीएमसी इतका झाला आहे. या दहा दिवसांत धरणांत केवळ 1.33 टीएमसी पाणी वाढले आहे. गतवर्षी मात्र आजच्या तुलनेत सुमारे 48 टक्के जादा पाणीसाठा झाला होता. गतवर्षी 1 जुलैपर्यंत धरणांत एकूण 43.2 टीएमसी इतका पाणीसाठा होता. धरणांच्या एकूण क्षमतेच्या 47 टक्के इतका पाणीसाठा गतवर्षी होता. यामुळे यावर्षी यापुढे पावसाचे प्रमाण वाढले नाही, तर सर्व धरणे भरण्यास ऑगस्टच्या मध्यानंतरचाच कालावधी उजाडेल, अशीही शक्यता आहे.

पावसाचा जोर वाढण्याची गरज

काही धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. मात्र, धरणांतील दोन वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीसा कमीच पाऊस झाला आहे. गतवर्षी 15 धरणांच्या परिसरात सरासरी 358.2 मि.मी. पाऊस आजअखेर झाला होता. यावर्षी तो 343.6 मि.मी. इतका झाला आहे. वळीव, मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण यावर्षी कमी राहिले. यामुळे धरणांत येणार्‍या पाण्याची आवक अजून वाढलेली नाही.

Back to top button