विठूराया 32 युगे करवीर नगरीत विराजमान | पुढारी

विठूराया 32 युगे करवीर नगरीत विराजमान

कोल्हापूर, गौरव डोंगरे : ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा… वामांगी रखूमाई दिसे दिव्य शोभा….पुंडलिकाच्या भेटी परब—ह्म आले गा… चरणी वाहे भिमा उद्धरी जगा…’ या पांडुरंगाच्या आरतीमध्ये विठ्ठल 28 युगे विटेवर उभा असल्याचा उल्लेख आहे. मात्र, याआधीच म्हणजे 32 युगे विठ्ठल भक्त पुंडलिकासाठी नंदवाळ येथे अवतरला होता, असा उल्लेख करवीर माहात्म्याच्या 47 व्या अध्यायात दिसून येतो.

शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असणार्‍या नंदवाळचा प्राचीन उल्लेख नंदग्राम असा आहे. त्याजवळचे वासुदेवाचे गाव म्हणजे वाशी असेही मानले जाते. प्रतिपंढरपूर मानल्या जाणार्‍या नंदवाळ येथील हेमाडपंथी मंदिरात विठ्ठल रोज रात्री मुक्कामाला असतो, अशी अख्यायिका आहेे.

मिरजकर तिकटीचा प्रवासी विठ्ठल

मिरजकर तिकटी येथील मंदिर हेमांडपंथी असून अकरावा ते बाराव्या शतकात बांधल्याचे मानले जाते. या ठिकाणी विठ्ठल, श्रीराम, एकमुखी दत्त, महादेव मंदिरे आहेत. विठ्ठल मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रुक्मिणी व सत्यभामा यांच्या मूर्तीही आहेत. पायात विशिष्ट अलंकार असून काहीजण त्यांना वाहाना मानतात. यामुळे विठ्ठलाला प्रवासी विठ्ठलही बोलण्यात येते. प्रतिवर्षी येथील विठ्ठल मंदिर ते नंदवाळ अशी 12 किलोमीटरची पायी दिंडी निघते.

भांग्या विठ्ठल ते भाविक विठोबा

उत्तरेश्वर पेठ परिसरातील भविक विठोबा हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. पंचगंगा नदीवर अंघोळीनंतर काही लोक येथे येऊन भांग पित. यामुळे याला भांग्या विठोबा म्हणत. पुढे भाविक विठोबा असे म्हटले जाऊ लागले. दहा लाकडी खांब, तीन फुटांच्या मातीच्या भिंती यामुळे भक्कम पद्धतीने हे मंदिर उभे आहे.

ज्ञानेश्वर मंडपात ग्रंथरूपी विठूराया

शनिवार पेठेतील ज्ञानेश्वर भजनी मंडपामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाही, तर ग्रंथांमध्ये विठूरायाचे रूप साकारण्यात आले आहे. या मंडपाला सुमारे 200 वर्षांची परंपरा आहे. मंडपाचे बांधकामही सागवानी लाकडाचा वापर करून करण्यात आले आहे. यासह यादव महाराज मंडप, लोणार गल्ली, कसबा बावडा तुकाराम मंडप, ज्ञानेश्वर मंडप, बुरुड गल्ली, राजघाट रोड, शिवाजी पेठ यांनी विठ्ठलभक्ती जोपासली आहे.

Back to top button