‘लोडशेडिंग’चा कृषिपंपांना झटका | पुढारी

‘लोडशेडिंग’चा कृषिपंपांना झटका

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यास यंदा पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. काळम्मावाडी धरणातील पाणी दुरुस्तीच्या नावाखाली सोडल्याने उपसाबंदीचे संकट असताना आता महावितरणने ‘फोर्स लोडशेडिंग’ सुरू केले असून, त्याचा झटका शेतकर्‍यांना बसत आहे.

जिल्ह्यातील धरणांमुळे बारमाही पाण्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरण दुरुस्तीचे कारण देत काळम्मावाडी धरणातून यंदा तब्बल 6 टीएमसी पाणी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवल्याचा आरोप आ. हसन मुश्रीफ यांनी केला होता.

एका बाजूने ही कृत्रिम टंचाई जाणवत असताना, यंदा पाऊसही लांबला आहे. कडक उन्हामुळे बाष्पीभवनाने पाणीसाठ्यावर परिणाम होत आहे. या सर्व कारणांनी जिल्ह्यातील बहुतांश धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. या पार्श्वभूमीवर उपसाबंदी जाहीर केली होती. एकीकडे उपसाबंदी, तर दुसरीकडे भारनियमन अशा दुहेरी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे.

दोन ते तीन दिवस उपसाबंदी ठेवली जाते. भारनियमनाचे संकट मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. एप्रिलमध्ये अगदी अत्यल्प प्रमाणात असलेल्या ‘फोर्स लोडशेडिंग’चे प्रमाण मे आणि जून महिन्यांत वाढले आहे. एप्रिल महिन्यात कधी तरी 15 ते 20 मिनिटे असणारे लोडशेडिंग आता मे आणि जूनमध्ये अर्धा तास ते तीन तास एवढ्या कालावधीपर्यंत पोहोचले आहे. जलसंपदा विभागाने नुकतीच उपसाबंदी उठविली असली, तरी पाणी उपसा करण्यासाठी भारनियमनामुळे वीज मिळत नसल्याने बळीराजा धास्तावला आहे. जिल्ह्यात कृषिपंपांचा वीज वापर सरासरी 400 ते 450 मेगावॅट इतका आहे. मे-जून महिन्यांत हा वापर 550 मेगावॅटवर पोहोचला आहे. राज्यातच विजेची मागणी वाढल्याने महावितरणने ‘फोर्स लोडशेडिंग’चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपसाबंदी उठताच वीज गायब झाल्याने शनिवारी रात्री महावितरणच्या कार्यालयात शेतकर्‍यांनी ठिय्या मारला.

Back to top button