कोल्हापूर : 50 हजारांची सुपारी देऊन मुलाचा खून | पुढारी

कोल्हापूर : 50 हजारांची सुपारी देऊन मुलाचा खून

यड्राव, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील राहुल दिलीप कोळी (वय 35) याची आत्महत्या नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राहुलचा खून करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकत आत्महत्येचा केलेला बनाव पोलिसांनी उघड केला. दारू पिऊन सतत त्रास देणार्‍या मुलाचा जन्मदात्याने 50 हजार रुपयांना सुपारी देऊन खून केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी राहुलचे वडील दिलीप तुकाराम कोळी (वय 55, रा. बिरदेव मंदिर मागे, तारदाळ), विकास अनिल पोवार (34, रा. जावईवाडी तारदाळ), सतीश शामराव कांबळे (34, रा. डॉ. आंबेडकरनगर, तमदलगे) या तिघा संशयितांना शहापूर पोलिसांनी अटक केली. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी न्यायालयाने दिले. शहापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक अंकुश माळी यांनी फिर्याद दिली.

राहुलच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मुलासह माहेरी राहते. दहा ते बारा वर्षांपासून राहुल सतत दारू पिऊन वडिलांकडे पैशांची मागणी करीत त्रास देत होता. त्यामुळे वडिलांनी विकास पोवार याला खुनाची सुपारी दिली. या खुनासाठी 50 हजार रुपये देण्याचे ठरले. वडील दिलीप याने 30 हजार रुपये दिले. विकासने साथीदार सतीश कांबळे याच्याबरोबर खुनाचा कट रचला. राहुलला दारू पाजून व स्वतःही नशा करून बुधवारी रात्री 11 च्या सुमारास आयकॉन फौंड्रीच्या मागे रेल्वे रुळाशेजारी कच्च्या रस्त्यावर विकासने लाकडी माराच्या सहाय्याने राहुलच्या तोंडावर, डोक्यात, कपाळावर व हातावर वार केले.

राहुलचा खून केल्याची माहिती वडील दिलीप याला दिली. दिलीपने खातरजमा केल्यानंतर खून करण्यासाठी ठरलेल्या रकमेतील उर्वरित 18 हजार रुपये दिले, अशी कबुली दिलीप याने पोलिसांसमोर दिली. खून करून पसार झालेल्या विकास व सतीश यांना इचलकरंजी येथील जुना एस. टी. स्टँड परिसरात अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

संशयित पोवार जामिनावर होता बाहेर

खून प्रकरणातील संशयित विकास पोवार हा 2012 मध्ये स्वतःच्या वडिलांचा खून करून कारागृहात होता. तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. याचा फायदा घेत दिलीप याने मुलाच्या खुनाची सुपारी दिली. मुलगा हाकनाक गेला आणि वडिलांच्या वाट्याला तुरुंगवारी आली.

Back to top button