कोल्हापूर महापालिका : वॉचमनला बनवलेय केंद्रस्तरीय अधिकारी | पुढारी

कोल्हापूर महापालिका : वॉचमनला बनवलेय केंद्रस्तरीय अधिकारी

कोल्हापूर ः सतीश सरीकर

राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना दिल्याने कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर धामधूम सुरू झाली आहे. परंतु, निवडणूक कामासाठी चक्क महापालिकेतील वॉचमन, पवडी कामगार आदी वर्ग चारमधील कर्मचार्‍यांची केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या आंधळ्या कारभारामुळे महापालिका निवडणुकीचा बट्ट्याबोळ होणार आहे.

निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा मतदार यादीचा आहे. त्यावरच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अवलंबून आहे. निवडणूक प्रक्रियेत केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचे काम जबाबदारीचे आहे. साधारणतः क्लार्क किंवा त्या दर्जाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचार्‍यांची नियुक्ती आवश्यक आहे. बीएलओची जबाबदारी मोठी असल्याने अनेकवेळा शिक्षकांनाही ही कामे दिली जातात. परंतु, शिक्षकांचा या अतिरिक्त कामाला विरोध आहे. त्यामुळे महसूल विभागातील किंवा इतर विभागांतील क्लार्क किंवा तृतीय श्रेणीतील कर्मचार्‍यांना बीएलओ म्हणून नियुक्ती देणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येत आहेत. लवकरात लवकर प्रभाग रचना करून आयोगाला अहवाल द्यायचा असल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महापालिकेतील 167 कर्मचार्‍यांची मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यात बहुतांश चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. अनेक कर्मचारी पवडी कामगार, वॉचमन आहेत. जेमतेम चौथी, सातवीपर्यंत शिक्षण असलेल्यांचीही केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने संबंधितांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत त्यांना हे पद सांभाळावे लागणार आहे. कर्तव्यात कसूर केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी जमेल तसे आणि जमेल तेवढे काम करत आहेत.

केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असली तरी नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म भरून घेणे, त्याची ऑनलाईन नोंदणी करणे, मतदार याद्या तयार करणे, याद्या फोडणे, पत्ता व नाव बदल आदी कामे करताना अनेक कर्मचार्‍यांना काय करावे आणि काय करू नये, हे समजत नसल्याचे वास्तव आहे. काही जणांना काम करताना नाकीनऊ येत आहे. काहीच अनुभव नसल्याने अनेक कर्मचारी तर पाट्या टाकण्याचे काम करत आहेत. त्याचे गंभीर परिणाम पुढील सर्व निवडणूक प्रक्रियेवर होण्याची दाट शक्यता आहे.

बीएलओंच्या गोंधळामुळेच मागील मतदार याद्यांत घोळ

महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली. त्यानंतर डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुुरुवात झाली. मतदार याद्या तयार करण्यात आल्या. परंतु, बीएलओ म्हणजेच केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी घातलेल्या गोंधळामुळे तब्बल अडीच हजारांवर सूचना व हरकती दाखल झाल्या होत्या. अनेक प्रभागांतील माजी नगरसेवक, इच्छुकांची नावेही त्यांच्या प्रभागातून गायब झाली होती. काही प्रभागांतील हजारांवर नावे दुसर्‍यांच प्रभागात नोंदविण्यात आली होती. अशाप्रकारे यापूर्वी केलेल्या मतदार याद्या प्रचंड त्रुटीमुळे अंतिम होऊ शकल्या नव्हत्या. शहरवासीयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. नावे बदलून घेताना अक्षरशः घाम फुटला होता. आताही तशीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे.

Back to top button