पक्षभेद विसरून दहशतवादाविरोधात लढले पाहिजे : अ‍ॅड. उज्ज्वल निकम | पुढारी

पक्षभेद विसरून दहशतवादाविरोधात लढले पाहिजे : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेवर 11/9 चा हल्ला झाला. त्यानंतर अमेरिकेने दहशतवाद्यांचा शोध घेतला. त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला शोधून काढले. पाकिस्तानात घुुसून त्याचा खात्मा केला. त्यावर अमेरिकेच्या सत्ताधारी, विरोधक आणि प्रसारमाध्यमे सार्‍यांनीच पूरक बाजू घेतली. नेमके याविरोधातील चित्र आपल्याकडे दिसते. दहशतवादाविरोधात मतभेद विसरून सर्व पक्षांनी एकदिलाने लढा दिला पाहिजे, असे निष्णात कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुढारी’कार कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत ‘भारत आणि दहशतवाद’ या विषयावर अ‍ॅड. निकम बोलत होते. व्यासपीठावर दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. अ‍ॅड. निकम यांच्या व्याख्यानासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक, विद्यार्थ्यांच्या झालेल्या गर्दीने शाहू स्मारक भवन खचाखच भरून गेले होते.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना अझहर मसूद याने पूलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे जम्मूहून श्रीनगरकडे निघालेल्या केंद्रीय राखीव दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला केला. आदिल नावाच्या एका व्यक्तीने 350 किलो आरडीएक्सने भरलेली कार या बसवर आदळली. या स्फोटात बसमधील सर्व 42 जवान शहीद झाले. यानंतर भारताने 26 फेब—ुवारी 2019 रोजी सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानमध्ये 12 विमानांतून घुसून 600 दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीरमधील 350 दहशतवादी ठार केले. मात्र, पुलवामा हल्ल्याबाबत आपण कल्पना दिली होती, असे मलिक यांनी म्हटले; पण हे केव्हा, जेव्हा ते राज्यपालपदावरून, सर्व अधिकार, लाभ भोगून निवृत्त झाल्यानंतर. त्यांनी हे त्याचवेळी का सांगितले नाही, सांगितले होते तर ते रेकॉर्डवर का घेतले नाही, असा सवाल करत तेदेखील त्याला तितकेच जबाबदार ठरू शकतात, असेही निकम यांनी सांगितले.

भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे आणि पाकिस्तानचे लष्कर दहशतवाद नियंत्रित करत असून, त्याला चीन अभय देत असल्याचे स्पष्ट करत 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणल्याचे अ‍ॅड. निकम म्हणाले.

भारतात 1990 ते 2001 च्या काळात झालेले दहशतवादी हल्ल्याचे नियोजन लाहोरमध्ये तत्कालीन राष्ट्रपती आणि लष्कराच्या मदतीने रचले गेले. तिथेच दहशतवाद्यांना प्रशिक्षित करून जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात होते. यानंतर कराची प्लॅन आला. तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’पुरस्कृत होता. ‘आयएसआय’ने धोरण बदलत, भारतातील तरुणांना जिहादी बनवले. सोशल माध्यमांद्वारे त्यांची माथी भडकवली, या भडकलेल्या डोक्यांचा फायदा घेतला, त्याचे उत्तम उदाहरण म्हणून इंडियन मुजाहिद्दीनकडे पाहावे लागेल. 1992 ला पाडलेल्या बाबरी मशिदीचा बदला म्हणून 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट केला. त्यात अनेक निष्पाप लोक मारले गेेले. यावेळी भारतातील टायगर मेननने दुबईत जाऊन कुख्यात गुंड दाऊदची भेट घेतली आणि हा दहशतवादी कारवायांचा प्लॅन केला होता. 2003 साली गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारात झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा स्वरूप बदलले आणि पाकिस्तानातच प्रशिक्षण देऊन दहा दहशतवाद्यांना भारतात पाठवून दिले. पाकिस्तानचा हा चेहरा, जगासमोर आणला आणि जगाला ते पटवून दिल्याचेही अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.

दहशतवाद म्हणजे छुपे युद्धच असते, असे सांगत अ‍ॅड. निकम म्हणाले, मुंबईच्या 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे, पाकिस्ताननेच हे दहशतवादी घडवले, तिथेच हा कट शिजला हे शिष्टमंडळासमवेत पाकिस्तानमध्ये जाऊन ठणकावून या दहशतवादी कृत्याबाबत या दहशतवादामागचा म्होरक्या लष्कर-ए-तोयबाचा हाफीज सईद याच्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा आपण केली. त्यावर त्यांनी पुरावे मागितले. दरम्यान, अमेरिकेच्या शिकागो न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या डेव्हिड हेडलीला भारतात माफीचा साक्षीदार केले. त्याची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सलग सात दिवस साक्ष घेतली. त्यात एक दिवस हेडली कॅमेर्‍यासमोर आला नाही, त्यावेळी चतुराई दाखवली आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला स्वतंत्र सॅटेलाईटची व्यवस्था करावी लागली, त्यातून हेडलीची घेतलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यातून भारतातील दहशतवादामागील खरा चेहरा समोर आला. अजमल कसाब याने न्यायालयात आपली बाजू मांडताना अल्पवयीन असल्याचे सांगत बचावाचा प्रयत्न केला, त्यावरून हे दहशतवादी किती प्रशिक्षित आहेत, हे स्पष्ट करत पकडले गेल्यानंतर तपास यंत्रणेला कसे गोंधळून टाकायचे, याचेही प्रशिक्षण देणारे लष्कर-ए-तोयबाचे मॅन्युअलच न्यायालयात वाचून दाखवले. या खटल्यात अजमल कसाबने भावनिक मुद्दे उपस्थित करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला; पण कसाबला फासावर लटकवलेच. कसाबला फाशी झाली यापेक्षाही दहशतवादामागे पाकिस्तान आहे हे जगासमोर आणता आले, हे या खटल्याचे वैशिष्ट ठरले, असेही निकम यांनी सांगितले.

पाकिस्तानमधील जनता ही सर्वसामान्य आहे, त्यांना भारतातील घडामोडी जाणून घ्यायच्या असतात, यामध्ये काही झाले तरी त्यांना काळजी असते. मात्र, पाकिस्तान लष्कराला राजवट नियंत्रणाखाली ठेवायची असते, त्यासाठी दहशतवादालाही पाकिस्तानचे लष्करच नियंत्रित करत आहे, असे सांगत सौदी अरेबिया, चीन आणि अमेरिका हे देश पाकिस्तानला दहशतवादाच्या निर्मूलनासाठी सहकार्य करत आहेत. अमेरिकन काँग्रेसने लष्करी सहकार्याचा ठरावही केला आहे. मात्र, हे सर्व अफगाणिस्तानच्या सीमेवरील दहशतवादासाठी होत आहे. भारतातील दहशतवादाबाबत हे देश बोलत नाहीत. यामुळे भारतालाही आता विशिष्ट राजनैतिक धोरण हाती घ्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

धार्मिक वाद टाळा

केवळ कठोर कायदा करून दहशतवादाला आळा बसणार नाही. कायदा जेवढा कठोर कराल तितके त्याचे दुष्परिणामच अधिक असतात. तसेच कायदा कठोर करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाही सक्षम असायला हवी, असे सांगत दहशतवाद रोखण्यासाठी कोण खरा हिंदू, कोण खरा नमाजी, माझा धर्म मोठा की तुझा धर्म मोठा, अशा धार्मिक श्रेष्ठत्वाची कल्पना डोक्यातून काढून टाका, सर्वच राजकीय आणि सामाजिक जीवनातील नेतृत्वांनी धार्मिक टिपणीपासून दूर राहावे, असे आवाहन करत धार्मिक वाद होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी डॉ. ग. गो. जाधव अध्यासन हे देशातील पत्रकारितेचे पहिले अध्यासन आहे. या माध्यमातून डिजिटल युगातील पत्रकार निर्माण करण्यासाठी निश्चित उपयोग होणार असल्याचे सांगितले.

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.

Back to top button