Kolhapur : मुंबई पोलीस भरती मध्ये गुडाळच्या मुलांचा षटकार! हॉटेल कामगाराच्या मुलीचे उल्लेखनीय यश | पुढारी

Kolhapur : मुंबई पोलीस भरती मध्ये गुडाळच्या मुलांचा षटकार! हॉटेल कामगाराच्या मुलीचे उल्लेखनीय यश

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलीस दलासाठी पोलीस भरतीची अंतिम यादी बुधवारी जाहीर झाली असून गुडाळ ता. राधानगरी येथील युवक- युवतींनी या भरतीमध्ये षटकार ठोकला आहे.

गुडाळ मधील चार युवक आणि दोन युवतींची या भरतीमध्ये निवड झाली आहे. या भरतीमध्ये एका हॉटेल कामगाराच्या मुलीनेही उल्लेखनीय यश संपादन केले असून मंगळवारी विवाहबद्ध झालेल्या एका तरुणाला बुधवारी पोलीस भरती झाल्याची सुखद बातमी समजली आहे.

अलीकडील काही वर्षात ग्रामीण तरुणांमध्ये पोलीस भरतीची क्रेझ निर्माण झाली आहे. अंगभूत मेहनत आणि चिकाटी हे गुण असलेले ग्रामीण भागातील शेकडो तरुण पोलीस भरतीचा सराव करताना दिसत आहेत. गुडाळ मधील ओंकार विठ्ठल पाटील या तरुणाचे मंगळवारी दुपारी लग्न झाले आणि बुधवारी त्याला पोलीस भरतीत यश मिळाल्याची सुखद वार्ता समजली. नव्या नवरीचा पायगुण चांगला असल्याची गमतीदार प्रतिक्रिया गावात व्यक्त झाली .

त्याचबरोबर अजित बाजीराव पाटील, सुधाकर सदाशिव पाटील, राजेंद्र आनंदराव माळवी या तरुणांबरोबरच कु. प्रियांका मारुती पाटील आणि कु. दीक्षा उत्तम कांबळे या दोन तरुणींनाही गावच्या पहिल्या महिला पोलीस होण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे दीक्षा चे वडील उत्तम कांबळे हे हॉटेल कामगार असून खडतर परिस्थितीत अतिशय जिद्दीने तिने यश संपादन केले आहे.

उर्वरित सर्वांची कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. ग्रामस्थांनी या सहाही जणांची उत्स्फूर्तपणे गावातून जल्लोषी मिरवणूक काढली आणि आनंद साजरा केला.

Back to top button