कोल्हापुरातील प्रश्न भीषण; प्रकल्प ठप्प, कचर्‍याचे डोंगर | पुढारी

कोल्हापुरातील प्रश्न भीषण; प्रकल्प ठप्प, कचर्‍याचे डोंगर

कोल्हापूर; सतीश सरीकर :  कोल्हापुरात दररोज सुमारे 225 टन कचरा निर्माण होतो. कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी लाईन बाजार येथे वीज निर्मिती प्रकल्प उभारला आहे. परंतु हा प्रकल्प गेली काही वर्षे ठप्प आहे. त्यामुळे सुमारे दहा एकर जागेत 5 ते 6 लाखहून जास्त टन कचर्‍याचे डोंगर उभारले आहेत. आता त्या कचर्‍याच्या डोंगराला आग लागत असून धुराचे लोट पसरत आहेत. प्रक्रियाच होत नसल्याने शहरातील कचर्‍याचा प्रश्न भीषण बनला आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लाईन बाजार, भोसलेवाडी, कदमवाडीसह इतर अनेक कॉलन्यांत सुमारे 30 हजारावर नागरिक राहतात. कचरा कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात कचर्‍याच्या डोंगरावर पडलेल्या पावसाचे पाणी काळेकुट्ट होऊन ते लिचेड थेट पंचगंगा नदीत मिसळते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठरावीक अधिकार्‍यांची कचर्‍यातून कमाई

गेले 20 ते 25 वर्षे कोल्हापुरात कचर्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी कचर्‍यावर बायोमायनिंगसाठी सुमारे 20 कोटींचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. मुदत संपली तरी 50 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. आता दुसरे लाखो टन कचर्‍याचे डोंगर तयार झाले आहेत. कचर्‍यावरच कचरा दाबून टाकण्यासाठी खासगी यंत्रणा भाड्याने घेतली असून वर्षाला सुमारे 70 ते 80 लाख रु. बिल होते. आता पुन्हा कचर्‍याचे डोंगर झाल्याने त्याच्या बायोमायनिंगसाठीही सुमारे 35 ते 40 कोटींचा खर्च आहे. ठरावीक अधिकार्‍यांना प्रश्न तसाच ‘तेवत’ ठेवण्यातच जास्त ‘इंटरेस्ट’आहे. कारण या ‘कचर्‍यातूनच’ खर्‍या अर्थाने त्यांची जोरात ‘कमाई’ होत असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

खासगी कंपनीने गुंडाळला प्रकल्प…

महापालिकेने 11 सप्टेंबर 2000 मध्ये झूम कंपनीला कचर्‍यापासून वीज निर्मितीसाठी 30 वर्षांचा ठेका दिला होता. 30 कोटींचा हा प्रकल्प होता. मात्र झूम कंपनीने हा ठेका अर्धवट सोडला. त्यामुळे लाईन बाजारमध्ये अक्षरशः कचर्‍याचे डोंगर उभारले आहेत. आता त्या परिसरालाच झूम असे नाव पडले आहे. त्यानंतर काही वर्षांपूर्वी कचर्‍यापासून वीजनिर्मितीसाठी मुंबईतील कंपनीला ठेका दिला. जानेवारी 2019 मध्ये कंपनीने काम सुरू केले. या कंपनीनेही दीड-दोन वर्षात गाशा गुंडाळला. महापालिकेने हा प्रकल्प चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला. मात्र संपूर्ण मशिनरीच खराब झाली आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पाला कचर्‍याचा वेढा पडला आहे.

दररोज जमा होणारा कचरा

ठिकाण                 मेट्रिक टन
व्यापारी संकुले            30
भाजी मार्केट               22
कत्तलखाने                 03
हॉटेल व रेस्टॉरंट         18
रहिवास क्षेत्र              118
जनावरांचे गोठे            13
उद्याने                        06
रस्ते सफाई                15

Back to top button