सीपीआरमध्ये सोनोग्राफीसाठीही वेटिंग | पुढारी

सीपीआरमध्ये सोनोग्राफीसाठीही वेटिंग

कोल्हापूर ः डॅनियल काळे सीपीआर रुग्णालयातील विविध सोयी, सुविधांवर आता ताण पडत आहे. रोगाचे निदान करण्यासाठी महत्त्वाचे असणार्‍या सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनसाठी आता आठ ते दहा दिवसांचे वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना वेदना सहन करत बसावे लागत आहे. रेडिओलॉजिस्ट कमी आणि रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे हे वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे रेडिओलॉजिस्टची भरती करणे आवश्यक आहे.

इमर्जन्सी आली तर करायचे काय, असा प्रश्वन रुग्णांच्या नातेवाईकांना पडत आहे. सीपीआरची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. एक ना धड… असेच येथील सुविधांचे वर्णन करावे लागेल. लोकप्रतिनिधी, प्रशासन याकडे लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

रोगाचे अचून निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीचा वापर केला जातो, परंतु या रुग्णांची सोनोग्राफी करणे आणि त्यात आढळलेल्या दोषाचे निदान करण्यासाठी रेडिओलॉजिस्टची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या आजाराचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी करणे आवश्यक असते. गरोदर मातांचीही सोनोग्राफी करावी लागते.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दररोज एक हजारावर रुग्ण ओपीडीसाठी येत असतात. यापैकी 70 ते 80 रुग्णांची सोनोग्राफी, सीटी स्कॅन या तपासण्या कराव्या लागतात. मात्र रेडिओलॉजिस्टच्या संख्येच्या तुलनेत रुग्णांची संख्या जास्त आहे. सीपीआरकडे चारच रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. अधिकवेळ काम करूनही सर्व रुग्णांच्या रोजच्या रोज तपासण्या होउ शकत नाहीत. त्यामुळे सीपीआरमध्ये आता सोनोग्राफीसाठी 8 ते 10 दिवसांचे वेटिंग करण्याची वेळ येत आहे.

रुग्णांची थांबायची तयारी नसेल तर मग खासगी निदान केंद्राकडे जावे लागते. येथे सोनोग्राफीसाठी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांवर एक तर वेटिंग करण्याची किंवा पैसे भरून खासगी निदान केंद्रातून सोनोग्राफी करून घेण्याची वेळ येत आहे. सीपीआरचे व्यवस्थापन पाहणार्‍या राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. इमर्जन्सी रुग्णांची तपासणी तातडीने केली जात असली तरी डॉक्टरांची आणि पूर्ण यंत्रणेचीच दमछाक यामुळे होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातही हीच स्थिती

जिल्ह्यातील इचलकरंजी, कोडोली, कसबा बावडा सेवा रुग्णालय आदी उपजिल्हा रुग्णालयातही रेडिओलॉजिस्ट नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बहुतांश ठिकाणी सोनोग्राफी मशिन आहेत. मात्र रेडिओलॉजिस्ट उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे देखील रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

Back to top button