कोल्हापूर : झूम प्रकल्पातील कचरा पुन्हा पेटला | पुढारी

कोल्हापूर : झूम प्रकल्पातील कचरा पुन्हा पेटला

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा :  लाईन बाजार येथील झूम प्रकल्पामधील कचरा रविवारी पुन्हा पेटला आणि आकाशात धुराचे लोट पसरले. दुपारी दीडच्या सुमारास अग्निशमन दलाचा एक बंब आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. दुपारी तीन नंतर बंब वाढवण्यात आले. काही खासगी टँकरही मागवण्यात आले, पण आग आटोक्यात आली नाही. घटनास्थळी महानगरपालिकेचे अधिकारी उशिरा दाखल झाले.

लाईन बाजार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प नागरी वस्तीत असल्यामुळे सुरुवातीपासूनच वादात आहे. जुन्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या रकमेचा ठेका देण्यात आला आहे. याचे काम सध्या सुरू आहे. सध्या प्रक्रिया सुरू असलेला परिसर कचर्‍यामुळे भरून गेला आहे. त्यामुळे नवीन कचरा जुन्या कचर्‍यावर डम्प केला जात आहे. याच कचर्‍याने गेल्या तीन दिवसांपासून पेट घेतला आहे. रविवारी कचर्‍याची ही आग भडकली आणि धुराचे लोट हवेत पसरले. सुमारे तीन किलोमीटर अंतरावरून धुराचे हवेत पसरणारे लोट दिसत होते. कसबा बावडा भोसलेवाडी दरम्यानचा रस्ता धुराने अंधारला होता. जुन्या प्रकल्प परिसरात 3 लाख 64 हजार घनमीटर कचरा आहे, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य वाटिका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले, रात्रीपर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच होते.

Back to top button