राजापूर बंधारा उन्हाळ्यात पाण्याखाली; कोयना धरणातून कर्नाटकसाठी पाण्याचा विसर्ग | पुढारी

राजापूर बंधारा उन्हाळ्यात पाण्याखाली; कोयना धरणातून कर्नाटकसाठी पाण्याचा विसर्ग

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा राजापूर ता.शिरोळ बंधारा भर उन्हाळ्यात पाण्याखाली गेला. कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे बंधाऱ्याची पाणी पातळी साडेसोळा फूट झाली आहे. आज (रविवार) पहाटे बंधारा ओव्हरफ्लो होऊन अंदाजे 3 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग कर्नाटककडे सुरू झाला आहे. टेंभू ताकारी योजनेतून पाण्याचा उपसा न झाल्याने बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. कर्नाटक राज्याने एक टीएमसी पाणी मागणी केली होती, मात्र ओव्हरफ्लोने आणखीन 1 टीएमसी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग झाला आहे.

दरम्यान गेल्या वर्षी मे महिना ते जून महिना अखेर पर्यंत पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने राजापूर बंधारा पूर्णपणे खुला झाला होता, मात्र यावर्षी कडक उन्हाचा पारा असताना देखील बंधारा ओव्हर फ्लो होऊन पाणी वाहत असल्याचे यावर्षी उलट चित्र पाहायला मिळाले आहे.

कर्नाटक राज्याच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने 1 टी.एम.सी पाणी देण्याचे वचन दिले होते ते पूर्ण झाले. कोयना धरणात जलसाठा असल्याने राजापूर बंधाऱ्यापर्यंत कृष्णा नदी आणि तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पंचगंगा नदीत बॅकवॉटरने पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून धरणातून विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे टेंभू आणि ताकारी योजनेलाही पाण्याचा उपसा केला जातो. गेली दोन दिवस सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने धुमाकूळ घातल्याने पाण्याचा उपसा न झाल्याने राजापूर बंधाऱ्याची साडेसोळा फूट पाण्याची लेवल होऊन बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. बंधार्‍याच्या वरून पाणी वाहू लागले आहे. महापुरात जशा पद्धतीने बंधारा पाण्याखाली जातो तसेच उन्हाळ्यात बंधारा पाण्याखाली जाण्याचा दुर्मिळ योग शिरोळ तालुकावासीयांना पाहायला मिळाला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून बंधारा ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. शनिवारी रात्रीपासून बंधार्‍यावरून पाणी वाहत असल्याने 3 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग कर्नाटक राज्याकडे सुरू झाला असून, अतिरिक्त 1 टी.एम.सी पाण्याचा कर्नाटक राज्याला विसर्ग झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Back to top button