अशी झाली होती ‘गावडे विद्यापीठा’ची पायाभरणी! | पुढारी

अशी झाली होती ‘गावडे विद्यापीठा’ची पायाभरणी!

कोल्हापूर, विशेष प्रतिनिधी : एका अडलेल्या विद्यार्थ्याला मदत करण्याच्या भरात सांगली जिल्ह्यातील शिगाव येथील रामचंद्र गावडे या प्राथमिक शिक्षकाकडून 1970 च्या दशकात नकळतपणे गावडे विद्यापीठाची पायाभरणी झाली होती. कालांतराने ही युक्ती नोकरी लागण्याच्या कामी येते, हे लक्षात आल्यावर परिसरातील आणि जवळपास राज्यभरातील हजारो लोक गावडे विद्यापीठाचे लाभार्थी बनत गेले.

1965 च्या आसपास रामचंद्र गावडे हे जिल्हा परिषदेच्या एका शाळेत प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या वर्गातील एक विद्यार्थी सातवीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यामुळे त्याला चालून आलेली नोकरीची संधी हुकणार होती. त्यामुळे त्या मुलाच्या आईने गावडे गुरुजींपुढे पदर पसरून मुलाला पास करण्याची याचना केली. संबंधित मुलाच्या दाखल्यावर सातवी नापास असा शेरा आधीच पडला होता, त्यामुळे त्याची अडचण झाली होती.

या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गावडे गुरुजींनी एक आयडिया केली. हेडमास्तरांच्या अपरोक्ष त्यांनी दाखला पुस्तकातील एक कोरा दाखला फाडून घेतला आणि त्यावर त्या मुलाचे नाव लिहून सातवी पास असा शेरा मारून हेडमास्तर म्हणून बोगस सहीसुद्धा करून टाकली. झाले… त्या मुलाची गाडी मार्गाला लागली, तो कुठे तरी नोकरीला लागून गेला.

अमक्या अमक्याचा पोरगा नापास असतानासुद्धा गावडे मास्तरांनी त्याला पास केले आणि त्याला नोकरी लागल्याची चर्चा सुरू झाली. पाठोपाठ त्या मुलाप्रमाणेच सातवीत गाडा अडकलेल्या बर्‍याच मुलांचे पालक गावडे मास्तरांना विणवण्या करायला लागले आणि गावडे मास्तरांनीही सातवी नापास पोरांना सातवी पासचे दाखले द्यायला सुरुवात केली. कालांतराने शाळेतील दाखले कमी पडायला लागले म्हणून गावडे मास्तरांनी बाहेरच्या बाहेरच दाखला पुस्तके छापायला आणि घाऊक प्रमाणात सातवी पासचे दाखले द्यायला सुरुवात केली आणि अर्थार्जन करायलाही सुरुवात केली.

दरम्यान, 1 जानेवारी 1966 रोजी राज्यात दहावी आणि बारावी परीक्षा बोर्डाची स्थापना झाली. त्याचप्रमाणे हळूहळू सातवी पासचे महत्त्वही कमी होत गेले. नोकरीसाठी किमान दहावी-बारावी पासची अट बहुतेक ठिकाणी लागू लागली. दहावी-बारावीपर्यंत जाऊन तटणार्‍यांसाठी पुन्हा एकदा गावडे गुरुजीच धावून आले. त्यांनी दहावी आणि बारावीची बनावट गुणपत्रके तयार करून ती वाटायला सुरुवात केली. कोणत्याही विद्यापीठाच्या आणि कोणत्याही पदव्यांची भेंडोळी वाटायला सुरुवात केली.

अल्पावधीतच गावडे गुरुजींच्या या अवतारकार्याचा राज्यभर गवगवा होऊ लागला आणि दहावी-बारावी पीडित मंडळी गावडे गुरुजींच्या शाळेत हजेरी लावू लागली. त्यामुळे गावडे गुरुजींचा व्याप वाढत चालला म्हणून त्यांनी बनावट कागदपत्रे बनविण्याच्या बाबतीतील काही कसबी कारागीर आपल्या मदतीला घेतले आणि आपल्या विद्यापीठाचा विस्तार वाढविला. या विद्यापीठात दहावी-बारावीची गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे हुबेहुब बनविणारे तंत्रज्ञ होते, कुणाच्याही सहीची एका क्षणात हुबेहुब नक्कल करणारे नकलाकार होते, गावडे गुरुजींनी हा गोरखधंदा बंद करेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत हे कारागीर त्यांच्या दिमतीला होते.

अनेकवेळा बनावट प्रमाणपत्राचे एखादे प्रकरण उघडकीला येते; पण त्याच्या आगेपिछे कोणताही पुरावा हाती लागत नाही. त्यामुळे हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित राहते आणि पोलिसांच्या हाती फारसे काही लागत नाही. (क्रमशः)

अनेक खटले, अनेकदा अटक!

बनावट गुणपत्रिकाप्रकरणी आजपर्यंत गावडे गुरुजींवर किती खटले दाखल झाले आहेत आणि किती वेळा त्यांना अटक करण्यात आली होती, याची गणती करणे मुश्कील आहे; पण ज्या ज्यावेळी गावडे गुरुजींना अटक झाली, त्या त्यावेळी या विद्यापीठाचे लाभार्थी त्यांच्या रक्षणासाठी धावून आलेले दिसतात. त्यांना जामीन मिळवून देणे, त्यासाठी एखादा वकील गाठून देणे, त्यासाठी लागेल ती आर्थिक तरतूद करणे ही सगळी कामे या विद्यापीठाचे लाभार्थीच आजपर्यंत करताना दिसून येत होते.

Back to top button