थॅलेसेमिया दिन : देशात दरवर्षी १० हजार बालके थॅलेसेमिया घेऊन जन्मतात | पुढारी

थॅलेसेमिया दिन : देशात दरवर्षी १० हजार बालके थॅलेसेमिया घेऊन जन्मतात

कोल्हापूर; गौरव डोंगरे :  भारतात वर्षाकाठी जवळपास १० हजार बालके थॅलेसेमिया घेऊन जन्माला येतात. शासकीय रुग्णालयांकडे तपासणी होत नसल्याने तसेच जनजागृती अभावी हे प्रमाण वाढत चालले आहे.

थॅलेसेमिया हा आजार आनुवंशिक व्याधी आहे. ‘थॅलेसेमिया मायनर’ रुग्ण सर्वसाधारणांप्रमाणे आपले जीवन जगत असतात. तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचे आजाराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आपण ‘थॅलेसेमिया मायनर’चे रुग्ण आहोत हे त्यांना कळतही नाही. त्यामुळे ज्यांना ‘थॅलेसेमिया मायनर’ हा आजार आहे. त्यांच्या मुलांमध्ये ‘थॅलेसेमिया मेजर’ या आजाराची लक्षणे दिसून येतात. थॅलेसेमियाग्रस्त बालकांमध्ये जन्मापासूनच हिमोग्लोबीनची निर्मिती होत नाही. या बालकांना प्रत्येकी १५ ते २१ दिवसांनी बाहेरील रक्त द्यावे लागते. सांगली, सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रक्तदानाकडे दुर्लक्ष असल्याने असे अनेक रुग्ण कोल्हापुरातून रक्त घेऊन जाण्यासाठी येतात. कोल्हापूर जिल्ह्यात अशा रुग्णांची संख्या ३०० घरात पोहोचली आहे. बाळामध्ये जन्म झाल्यानंतर ४-६ महिन्यांमध्ये ‘थॅलेसेमिया मेजर’ या आजाराची लक्षणे दिसू लागतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ही बालके अशक्त बनतात. अंग पिवळे पडू लागते. त्यांच्या लोहाची कमतरता दूर करण्यासाठी प्रत्येकी १५ ते २१ दिवसांनी बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो.

थॅलेसेमिया, हिमोफेलिया रुग्णांना मोफत रक्ताची बॅग पुरविणे ब्लड बँकाना बंधनकारक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदात्यांच्या जागरुकपणामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत नाही. मात्र, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही दुर्गम, ग्रामीण भागात अशा रुग्णांची फरफट होताना दिसते. यासाठी आम्ही एक ब्लड डोनर ग्रुप बनविला असून त्याद्वारे आम्ही अशा गरजेवेळी रक्तदाते उपलब्ध करुन देतो. – धनंजय नामजोशी, अध्यक्ष, फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया

आजाराची मुख्य लक्षणे अशी

अशक्तपणा, हृदयाच्या समस्या, थकवा, शरीर पिवणे पडणे, अस्थी विकृती.

थॅलेसेमिया चाचणी आवश्यक

‘थॅलेसेमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्य ‘थॅलेसेमिया मेजर’ असू शकते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा अपत्यासाठी इच्छुक असणार्यांनी थॅलेसेमिया मायनरची रक्त चाचणी करणे आवश्यक आहे.

Back to top button