कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाईल टाकणार्‍या माय-लेकास पकडले | पुढारी

कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाईल टाकणार्‍या माय-लेकास पकडले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरून थंडपेयाच्या रिकाम्या बाटलीतून गांजा, मोबाईलसह अन्य संशयास्पद पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या माय-लेकास कारागृह रक्षकांनी रविवारी सकाळी रंगेहाथ पकडले. संशयित कोमल सुनील भोरे (वय 38, रा. राजेंद्रनगर) हिच्यासह अल्पवयीन मुलाला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात अलीकडच्या काळात मोबाईलसह गांजा तसेच अन्य संशयास्पद पदार्थ सातत्याने सापडत असल्याने कळंबा कारागृह प्रशासन टीकेचे लक्ष्य बनले आहे. रविवारी सकाळी अनोळखी महिला अल्पवयीन मुलासह कारागृहाच्या पूर्व बाजूला घुटमळत होती. काही काळाने ती तटबंदीजवळ गेली. तीन क्रमाकांच्या सुरक्षा मनोर्‍यावरून पहारा देणारा सुरक्षा रक्षक अरुण बाबर याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी महिलेच्या संशयास्पद हालचालीवर लक्ष केंद्रित केले. तातडीने तटबंदीजवळून जात असताना महिलेने भिंतीवरून बाटली जेलमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. रक्षकाने महिलेसह मुलाला ताबडतोब ताब्यात घेतले. महिलेकडून 235 ग्रॅम गांजा, एक मोबाईल, पांढर्‍या रंगाचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. सायंकाळी माय-लेकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Back to top button