कोल्हापूर : धरण, तलावातील गाळ शेतकर्‍यांच्या शिवारात | पुढारी

कोल्हापूर : धरण, तलावातील गाळ शेतकर्‍यांच्या शिवारात

कोल्हापूर, सुनील सकटे : गाव तलाव आणि धरणांतील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना धरण अथवा तलावातील गाळ शेतीपर्यंत पोहोच करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर शेतकर्‍यांना एकरी 15 हजार रुपयांप्रमाणे हेक्टरी 37 हजार रुपये अनुदानही दिले जाणार आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांना शेती उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे.

या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना एकरी 15 हजार रुपये याप्रमाणे अडीच एकर क्षेत्रासाठी 37 हजार 500 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री व इंधन खर्चासह शेतकर्‍यांच्या शिवारात गाळ पसरण्याचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर यांनी दिली.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एटीई चंद्रा फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याने मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा प्रशासन ही योजना राबवणार आहे. जिल्हा परिषद, जलसंधारण व जलसंपदा विभागाच्या मालकीच्या लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढून तो शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. भारतीय जैन संघटना या योजनेसंदर्भात प्रबोधनाचे काम करणार आहे. तर चंद्रा फाऊंडेशनतर्फे विशिष्ट प्रकारचे अ‍ॅप बनवून या अ‍ॅपद्वारे प्रकल्पातील गाळ काढण्यापासून शेतकर्‍यांच्या शिवारात गाळ पोहोचेपर्यंत सर्व माहिती संकलित करणार आहे. त्यामुळे योजना पारदर्शकपणे राबविण्यास मदत होणार आहे.

विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्तांचे कुटुंब, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना प्राधान्याने गाळाचे वाटप केले जाईल. मागणीनुसार प्रत्येक शेतकर्‍यांना गाळ उपलब्ध करून जाईल, असे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेऊन कृषी उत्पादनात भरीव वाढ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जलसंधारण अधिकारी आजगेकर यांनी केले आहे.

Back to top button