कोल्हापूरची हवा गेली सव्वा वर्षे प्रदूषितच | पुढारी

कोल्हापूरची हवा गेली सव्वा वर्षे प्रदूषितच

कोल्हापूर; आशिष शिंदे  :  स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. परिणामी, देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत शहराचा समावेश झाला असूनदेखील गेली सव्वा वर्षे कोल्हापूरची हवा प्रदूषितच आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान दाभोळकर कॉर्नर परिसरामध्ये एकदाही उत्तम हवेची नोंद झालेली नाही. एकही दिवस उत्तम हवेची नोंद नसणे ही धोक्याची घंटा असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले.

गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत ‘एमपीसीबी’च्या वतीने दाभोळकर कॉर्नर परिसरातील हवेची गुणवत्ता 124 वेळा तपासण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 104 वेळा येथील वायू गुणवत्ता निर्देशांक व्याधीग्रस्तांसाठी व लहान मुलांसाठी धोकादायक पातळीवर होता. वायू गुणवत्ता निर्देशांक 17 वेळा समाधानकारक होता; मात्र एकदाही उत्तम नोंदविला गेलेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार तर येथे श्वसनावाटे फुफ्फुसात जाणार्‍या श्वसनीय धूलिकणांचे (आरएसपीएम) प्रमाण 145 मायक्रोग्रॅम क्युबीक मीटर, तर अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण तब्बल 315 मायक्रोग्रॅम क्युबीक मीटर इतके झाले आहे. हे प्रमाण मानवी आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.

 व्याधीग्रस्तांसाठी शहरातील हवा डेंजर

वायू गुणवत्ता निर्देशांक 50 च्या आत असेल, तर हवा उत्तम मानली जाते. याचा श्वसनावर कोणताही परिणाम होत नाही. वायू गुणवत्ता निर्देशांक 50 ते 100 दरम्यान असेल, तर सेन्सेटिव्ह लोकांना याचा त्रास होऊ शकतो. 101 ते 150 दरम्यानचा निर्देशांक व्याधीग्रस्तांसाठी व लहान मुलांसाठी धोकादायक मानला जातो. दाभोळकर कॉर्नर परिसरातील वायू निर्देशांक 130 इतका आहे. महाद्वार रोड परिसरात 81, तर शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये 62 इतका आहे. शहरामध्ये कमालीचे वातावरणीय बदल पाहायला मिळत आहेत. अचानक तापमानात घसरण झाल्याने आणि हवेची गती मंदावल्याने प्रदूषित हवा जमिनीलगत स्थिरावू लागते. अशात शहरातील हवेमध्ये वाढलेले धूलिकणांचे प्रमाण श्वसन संस्थेवर आघात करू शकते.

वायू गुणवत्ता निर्देशांक

(निर्देशांक 50 च्या आत असेल तरच हवा उत्तम मानली जाते.)

दाभोळकर कॉर्नर 130
महाद्वार रोड 81
शिवाजी विद्यापीठ 62 

हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यांची डागडुजी तसेच रोड स्विपिंग मशिनचा नियमित वापर होणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे, तसेच रस्त्यांच्या बाजूला असणार्‍या झाडांची निगा राखावी.
– डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

 

Back to top button