सुदानमधील कोल्हापूरकर परतीच्या मार्गावर | पुढारी

सुदानमधील कोल्हापूरकर परतीच्या मार्गावर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सुदानमध्ये उसळलेल्या हिंसाचारात अडकलेल्या भारतीयांमध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील नागरिकांचा समावेश आहे. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील मालेवाडी (ता. वाळवा) येथील तरुण विजय माने याचे सुखरूप आगमन झाले आहे. 19 तरुणांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे तरुण खा. धैर्यशील माने व आ. प्रकाश आवाडे यांच्या संपर्कात आहेत.

सुदानमधील हिंसाचाराने भारतीय नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. सरकारनेही परत आणण्यासाठी योजना आखली आहे. सुदानमधील केनाना शुगर कंपनीत कोल्हापूर, सांगली सातारा येथील तरुण सेवेत आहेत. या तरुणांनी खा. धैर्यशील माने व आ. प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात शंकर विलास पाटील (रा. येडे निपाणी, जि. सांगली), मारुती सर्जेराव राऊत, सतीश संभाजी पाटील, सतीश संभाजी पाटील, संभाजी नारायण पाटील (रा. पाडळी, जि. कोल्हापूर), राजाराम नारायण पाटील (गोटखिंडी, जि. सांगली), सचिन राजाराम यादव (नागठाणे), अनिल विजयकुमार अवटी, संजय शंकर बिरंगड्डी, मल्लिकरण सत्याप्पा काणे, (इचलकरंजी, जि. कोल्हापूर), सलमान खलीद मुल्ला (इस्लामपूर, जि. सांगली), सचिन नामदेव पोळ (सातारा), जितेंद्र श्रीकांत डोळ (तासगाव), वैभव धनाजी माने (फाळकेवाडी), संदीप बाबूराव खराडे (येलूर, जि. सांगली), राजेंद्र विलास पाटील, राजेंद्र शंकर पवार (बागणी, जि. सांगली), राहुल शिवाजी विभूते (आष्टा, जि. सांगली), दीपक भालचंद्र पाखरे (दुधगाव, जि. सांगली) आदी 19 नागरिक संपर्कात आहेत.

स्थलांतरासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये दंगलीची झळ सर्वाधिक असलेल्या भागातील नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर करण्यात येत आहे. त्यानंतर उर्वरित दोन टप्प्यात संबंधितांचे स्थलांतर केले जाणार आहे.

आ. आवाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क झाला आहे. त्यांनी अन्नधान्य, पाणी, वैद्यकीय सेवा व इंधनाची कमतरता भासत असल्याचे सांगितले. भारतीय दुतावासाशी संपर्क होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे.

संजय शंकर बिरंगड्डी सुदानमध्ये केनाना साखर कारखान्यात नोकरीस आहेत. तेथे व्यवस्थापनाने आम्हाला पैसे दिले असले तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट-तिप्पटपेक्षा जास्त वाढले असून या किमतीतही या वस्तू मिळत नसल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आवाडे यांनी दिली.

Back to top button