कळंबा जेलमधून आणखी दोन मोबाईल, बॅटरी जप्त | पुढारी

कळंबा जेलमधून आणखी दोन मोबाईल, बॅटरी जप्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दोन हजारांवर नामचीन गुंड, कुख्यात संघटित टोळ्यांचे वास्तव्य असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. मंगळवारी सकाळी कारागृहात आणखी दोन मोबाईल, बॅटरी, चार्जर आढळून आल्याने अधिकार्‍यांसह सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली आहे. कारागृहातून गेल्या तीन दिवसांत सहा मोबाईलसह चार्जर, बॅटर्‍या हस्तगत करण्यात आला आहे.

कडेकोट तटबंदी आणि भक्कम सुरक्षा यंत्रणेचा दावा करणार्‍या मध्यवर्ती कळंबा कारागृह प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. बंदिस्त कारागृहातून तीन दिवसांत सहा मोबाईलसह गांजा, चार्जरसह बॅटर्‍यांचा साठा आढळून आल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारागृहातील सुरक्षारक्षक जितेंद्र प्रभाकर बांदल (56, रा. कळंबा, ता. करवीर) हे मंगळवारी सकाळी जेलमधील रुग्णालयांतर्गत क्वारंटाईन विभागात कार्यरत असताना पाण्याच्या हौदाजवळ खाकी रंगाचा चिकटपट्टीने गुंडाळेला पुडका आढळून आला. बांदल यांनी वरिष्ठ अधिकारी कदम यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. संबंधित पुडका उघडला असता त्यामध्ये दोन मोबाईल, चार्जर व बॅटर्‍या आढळून आल्या.

बरॅकची तपासणी कैद्यांची घेतली झाडाझडती

या घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध सायंकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसारे यांनी सायंकाळी कारागृहातील सर्वच बरॅकची तपासणी करून कैद्यांची झाडाझडती घेतली.

Back to top button