कोल्हापूर : वादग्रस्त ए. एस. ट्रेडर्सच्या 6 संचालकांचे दुबईला पलायन | पुढारी

कोल्हापूर : वादग्रस्त ए. एस. ट्रेडर्सच्या 6 संचालकांचे दुबईला पलायन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटकसह सात राज्यांतील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपनीतील प्रमुख सहा संचालकांनी थेट दुबईत आश्रय घेतला आहे. या ट्रेडर्सविरोधात कृती समितीने एक महिन्यापूर्वी केलेल्या तक्रारीत संचालकांना तातडीने अटक करा, अन्यथा ते परदेशात पळून जातील, अशी भीती व्यक्त केली होती. संचालक दुबईला गेल्याने गुंतवणूकदार हादरले आहेत.

संशयित संचालकांनी कंपनीतील कोट्यवधीची रक्कम परस्पर परदेशात गुंतविली असावी, असा संशयही तपास अधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे. कंपनीच्या आठ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयितांचे अर्ज फेटाळून लावल्याने संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. असेही सांगण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील विशेष पथकासह सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

तपास यंत्रणा गतिमान करा : कृती समितीची मागणी

ए. एस. ट्रेडर्सविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक पिंगळे यांची भेट घेऊन तपास यंत्रणा गतिमान करण्याची मागणी केली.

कार्यालयांना टाळे, एजंट फरार

कमी कालावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ए. एस. कंपनीच्या प्रमुखांसह संचालक, एजंटांनी सुमारे दीड लाखांवर गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. कंपनीच्या प्रमुखांसह संचालक, एजंटांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून शाहूपुरी येथील मुख्यालयासह संलग्न कंपन्यांच्या सर्वच कार्यालयांना टाळे ठोकून सारेच पसार झाले आहेत.

मुद्दल, परताव्याची शक्यता धूसर

27 संशयितांपैकी केवळ एका संचालकाला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित पसार झालेल्या सर्वच संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर 2022 पासून गुंतवणूकदारांना मुद्दलसह परतावाही देण्याचे बंद झाले आहे. संचालकांसह प्रमुख एजंटांनी दुबईला पलायन केल्याची माहिती समोर आल्याने गुंतवणुकीची रक्कम व परतावे मिळण्याची शक्यता मावळली आहे.

65 गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे, निरीक्षक औदुंबर पाटील यांनी ए. एस. ट्रेडर्समध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळ अखेर 65 गुंतवणूकदार पुढे आले होते.

बड्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचीही गुंतवणूक

संबंधितांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. ए. एस. ट्रेडर्स कंपनीत शहर, जिल्ह्यातील अनेक बड्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र तक्रार दाखल करण्यास राजी नसल्याचे चित्र आहे.

Back to top button