राज्यातील पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे बहरली | पुढारी

राज्यातील पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे बहरली

कोल्हापूर : गुड फ्रायडे ते रविवार अशा चार दिवस सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांच्या गर्दीने कोकणातील समुद्रकिनारे, विविध पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे रविवारी गर्दीने बहरली होती. संकष्टी चतुर्थी रविवारी आल्याने गणपतीपुळेसह अष्टविनायक मंदिरांच्या स्थळीही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

कोल्हापुरात पर्यटकांच्या गर्दीचा सुपरसंडे

कोल्हापूर : गुड फ्रायडेसह सलग आलेल्या शनिवार आणि रविवारमध्ये शहर पर्यटकांनी फुलले आहे. अंबाबाई, रंकाळा, न्यू पॅलेस, पन्हाळा यासोबतच जोतिबाचीही पाकाळणी असल्याने बाहेरील जिल्ह्यातील भाविक शहरात दाखल झाले. रविवारी दिवसभर शहर गर्दीने बहरले होते. शुक्रवारी झालेल्या गुड फ्रायडेनंतर सलग आलेल्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले. तसेच विकेंडचा प्लॅन करून कोकणात जाणारे अनेक पर्यटकही कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन मार्गस्थ होत असतात. चैत्र यात्रेनंतर जोतिबाची पहिली पाकाळणी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून जोतिबाचे भक्तही डोंगरावर दाखल झाले होते. यातीलही अनेक भाविक घरी परतण्यापूर्वी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी शहरात आल्याचे दिसले.

भर उन्हातही भाविक दर्शनाला

अंबाबाई दर्शन रांगा दुपारपर्यंतही फुल्ल होत्या. सरलष्कर भवन समोरील मंडप भरल्याने भाविकांची रांग जुना राजवाडा परिसरापर्यंत लागून राहिली होती. मंदिरातही भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी प्रदक्षिणा मार्गावर मॅटीन टाकण्यात आले आहे. तसेच गाभार्‍यातही नव्याने 10 मिस्ट फॅन जोडण्यात आले आहेत.

मोरगावला संकष्टी चतुर्थीनिमित्त गर्दी

मोरगाव : संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगाव (ता. बारामती) येथे भाविकांनी दिवसभर मोठी गर्दी केली. शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्ट्या असल्याने मयुरेश्वर मंदिरात पुणे जिल्हाभरातून भाविक आले होते. भाविकांसाठी पहाटे पाच वाजता मंदिराचे प्रवेशद्वार खुले केले होते. तत्पूर्वी श्री मयुरेश्वराची पूजा पुढील करण्यात आली. मयुरेश्वराच्या दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिक. लहान मुले, महिला यांची संख्या मोठी होती. देवस्थानकडून त्यांना सुविधा दिली होती. मंदिर परिसरात उन्हाचा चटका लागू नये यासाठी चटई अंथरलेली होती.

चर्तुर्थीदिनी लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन

नारायणगाव ः अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. रविवारी पहाटे 4 वाजता श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत रांगेत सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी 12.00 वाजता माध्यान्ह आरती करण्यात आली. नियमित पोथी वाचन, श्रीस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. रविवारी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री विघ्नहरासमोर स्वस्तिक आकाराची फुलांची सजावट करून त्यावर श्री विघ्नहराचा सोन्याचा मुकुट ठेवण्यात आला होता.

Back to top button