‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यास प्रारंभ | पुढारी

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यास प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : धडाडणार्‍या तोफा, घोड्यांच्या टापांचा आवाज, तुतारीच्या निनादातील छत्रपती संभाजी राजांचा नेत्रदीपक राज्यरोहण सोहळा, नयनरम्य आतषबाजी, दीडशे फुटांचा रंगमंच आणि सोबतीला डॉ. अमोल कोल्हे व डॉ. गिरीश ओक यांच्या भारदस्त आवाजातील दमदार संवादांची जुगलबंदी यातून परमोच्च बिंदू साधणार्‍या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याने पहिल्याच दिवशी शुक्रवारी कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठाव घेतला.

या महानाट्याला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तपोवन मैदानावर कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी रसिकांनी अवघा परिसर दणाणून सोडला.

महेंद्र महाडिक लिखित व दिग्दशिर्र्त आणि डॉ. अमोल कोल्हे अभिनित या महानाट्याचा शाहू महाराज यांच्या हस्ते, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, व्ही. बी. पाटील, डॉ. घनश्याम राव यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला.

मंचासमोरून दौडणारे घोडे, ढाल-तलवारींचा खणखणाट, संभाजी महाराजांच्या प्रवेशाला हजारो कोल्हापूरकरांनी उभे राहून दिलेली उत्स्फूर्त दाद, शिट्या-टाळ्या आणि घोषणांनी दणाणणारे प्रेक्षागृह असे अद्भूत द़ृश्य उपस्थितांनी अनुभवले. पुरंदर किल्ल्यावर शंभूराजेंचा जन्म, आग्य्रावरून सुटका, जंजिरा मोहीम, अनाजी पंतांची कटकारस्थाने, शंभूराजेंच्या बदनामीच्या कारस्थानांची द़ृश्ये मंचावर सादर झाली. मध्यंतरानंतर संभाजी महाराज आणि मुघल सम-ाट औरंगजेब यांच्यातील जुगलबंदी रसिकांना पाहावयास मिळाली. बुधवारपर्यंत (दि. 12) सादर होणार्‍या या महानाट्याने साक्षात स्वराज्यच कोल्हापूरकरांच्या समोर उभे राहणार आहे. महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत प्राजक्ता गायकवाड, महेश कोकाटे, रमेश रोकडे, अजय तापकिरे आणि दुहेरी भूमिकेत विश्वजित फडते यांनी दमदार अभिनय केला. या महानाट्यात कोल्हापुरातील 150 कलावंतांनीही भूमिका साकारल्या आहेत.

Back to top button