‘शिवपुत्र संभाजी’ सहकुटुंब अनुभवा… | पुढारी

‘शिवपुत्र संभाजी’ सहकुटुंब अनुभवा...

डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या जगदंब क्रिएशन निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग 7 ते 12 एप्रिलदरम्यान कोल्हापुरातील तपोवन मैदानावरील भव्य खुल्या रंगमंचावर होणार आहेत. या निमित्ताने डॉ. कोल्हे यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेली सविस्तर विशेष मुलाखत…

छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा दोन्ही भूमिका तुम्ही केल्या. यापैकी तुमची आवडती भूमिका कोणती?

खूप सोपं सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी ज्यावेळी करतो, त्यावेळी मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, पण ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायची वेळ येते त्यावेळी मी कुठून तरी आतून पेटून उठतो. कारण स्वराज्याच्या धाकल्या धन्यांचा एवढा मोठा इतिहास असताना त्यांचा इतिहास वर्षानुवर्षे मलिन केला गेला, नाकारला गेला. या भावनेने खरंतर मी पेटून उठतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या हिंदुस्तानला राष्ट्र ही संकल्पना दिली. महाराजांचे स्वराज्याचे काम हे खरंतर राष्ट्र उभारणीचे काम होतं. कारण तोपर्यंतची राज्य राजांची, संस्थानिकांची होती. महाराजांचं पहिलं रयतेचं राज्य होतं. हे राष्ट्र उभारणीचं कार्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जे कार्य आहे ते राष्ट्ररक्षणाचं आहे. त्यामुळे राष्ट्र उभारणी आणि राष्ट्ररक्षण हे तेवढेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दोन्ही भूमिका करताना एक शिवशंभूभक्त म्हणून माझी भावना केवळ जबाबदारीची आहे.

‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे वेगळेपण काय?

रंगभूमीवरचं जे नाटक आहे त्याच्या किमान 15 ते 20 पट महानाट्य मोठं असतं. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर केवळ स्टेजची रुंदी 150 फूट आहे. सेटची उंची 65 फूट आहे. एकावेळी साडेनऊ-दहा हजार प्रेक्षक महानाट्य अनुभवत असतात. हा एक जिवंत अनुभव आहे. जसा नाटकातला जिवंत अभिनय काळजाला भिडतो. हा अनुभवही असाच जिवंत असतो. त्यामध्ये घोडे, बैलगाड्या, लढाया आहेत. ही सगळी भव्यता, सगळा जिवंत अनुभव पुढच्या पिढीच्या काळजावर कोरला जाणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड या अभ्यासक्रमामध्ये किंवा कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये छत्रपतींच्या स्वराज्याचा इतिहास सविस्तरपणे शिकवला जात नाही. आमचा इतिहास भव्य रूपात साकारणारं हे महानाट्य केवळ नाटक राहत नाही, तर तो एक कौटुंबिक सोहळा होऊन जातो. म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन की, हे महानाट्य पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबानं यावं, आई-वडिलांनी, मुलांनी, आजी-आजोबांनी सगळ्यांनी यावं. या अनुभवातून कळत नकळत आपल्या मातीचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा काळजावर कोरला जाईल.

महानाट्याने दोनशे प्रयोग पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुरुवातीचं महानाट्याचं स्वरूप, आतापर्यंतचा प्रवास आणि या पुढच्या काळातील योजना याबाबत काय सांगाल?

आता जर तुम्ही महानाट्य बघत असाल, विशेषतः कोव्हिड नंतरच्या काळात डिसेंबर महिन्यात याचे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रयोग झाले. त्यानंतर नाशिकमध्ये प्रयोग झाले. नाशिकमध्ये 65 हजार प्रेक्षकांनी हे महानाट्य बघितलं. संभाजीनगरमध्ये 55 हजार प्रेक्षकांनी हे महानाट्य बघितलं. निपाणी मध्ये जेव्हा प्रयोग केले. तिथे दररोज जवळपास 25 ते 30 हजार प्रेक्षक सहा दिवस सातत्याने येत होते. माझी अपेक्षा आहे की, कोल्हापुरात या सर्वांचा उच्चांक होईल. यानंतरच्या पुढच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा आणखी बदल होतील. आम्ही यामध्ये सातत्याने बदल करत आहोत. शेवटी हा प्रयोग असतो. त्यामुळे प्रत्येक प्रयोगागणिक काही बदल होत असतात. त्यामुळे 2015 मध्ये ज्यांनी महानाट्य बघितलं त्यांना आता 2023 मध्ये महानाट्य बघताना खूप वेगळा आणि भव्य अनुभव येईल. हा सेट पूर्ण नवीन आहे, हे रेकॉर्डिंग नवीन आहे. त्याच्यातल्या घोड्यांच्या एन्ट्रीज नवीन आहेत. याच्यामध्ये राज्याभिषेकाचा सिक्वेन्स संपूर्ण वेगळा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याची एक पूर्ण वेगळी अनुभूती येईल. महानाट्यात आम्ही सतत इम्प्रुव्हमेंट करत राहतो. दिवाळीनंतर महानाट्याचे प्रयोग हिंदीमध्येसुद्धा सादर करू, जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचण्यास मदत होईल.

शंभूराजे साकारत असताना तुमच्यासमोर शिवाजी महाराज म्हणून शंतनू मोघे उभे राहिले, त्यावेळी तुमची नेमकी काय भावना होती?

शंतनू मोघे उत्तम कलाकार आहेत; परंतु लहान मूल जरी जिरेटोप आणि कवड्याची माळ घालून आलं तरीसुद्धा मी आधी मुजरा करतो. ही प्रत्येक शिवभक्ताची भावना आहे. मी शंभूराजे यांची भूमिका साकारत होतो. शंतनू मोघे शिवाजी महाराजांची भूमिका साकारत होते. यामध्ये कुठेही मी असं साकारलं, हे असं साकारत आहेत, अशी तुलना नव्हती. शंभूराजेंचा इतिहास मालिका रूपात मांडण्यासाठी मी नऊ वर्षे वाट बघितली. मला आठवत नाही मी किती चॅनलचे उंबरठे झिजवले, किती जणांना विनंती केली असेल. हे सगळं करून झालं तेव्हा कुठे ही संधी निर्माण झाली. स्वराज्यरक्षक संभाजी हे यश माझं एकट्याचं अजिबात नाही. हे श्रेय आमच्या संपूर्ण टीमचं आहे महत्त्वाचं म्हणजे हे मायबाप प्रेक्षकांचे श्रेय आहे. त्यांनी ही मालिका डोक्यावर घेतली म्हणून ती यशस्वी झाली. एकच कलावंत दहा वर्षांचा स्पॅनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या भूमिकेत प्रेक्षकांनी तेवढाच स्वीकारला त्यामुळे हे माझं श्रेय नाही तर मायबाप प्रेक्षकांचं श्रेय आहे, असं मी मानतो.

कोल्हापूर आणि परिसराममधील तुमच्या मालिकेत ज्योत्याजी केसरकरांसारखं पात्र येतं. या पात्रासंदर्भात तुमच्या संशोधनामध्ये नेमकं काय आलं आणि यावर आणखी काही करावं असं तुम्हाला वाटतं का?

ज्योत्याजी केसरकर असतील किंवा अन्य कुणी सहकारी त्यांच्याशी त्यांचं नातं जिवलग मित्रासाखं होतं. तुम्ही ते मालिकेतही बघितलं आहे. संपूर्ण संशोधनात आमचे लेखक प्रताप गंगावणे सरांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी या भागातले सगळे बारकावे बाहेर काढले आणि या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढे आणला. मसूद माले गावात पिता-पुत्रांची झालेली झालेली भेट किंवा त्यांचे पन्हाळ्यावरचं शंभूराजांचं वास्तव्य अशा अनेक गोष्टी या मालिकेतून महाराष्ट्रासमोर आल्या.

याच प्रकारच्या ‘मुगल ए आझम’ या शोसाठी तीन हजार, पाच हजार, आठ हजार, दहा हजार रुपयांपर्यंत तिकीट असतं. आपण याचा तिकीट दर फक्त तीनशे रुपये, पाचशे रुपये, हजार रुपये, दीड हजार रुपये एवढाच ठेवला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अनाथ, वंचितांना महानाट्य दाखवण्याची जबाबदारी घ्यावी. अशा काही दानशूर व्यक्ती मला भेटल्यात की त्यांनी दीडशे अनाथाश्रमातल्या मुलांना हे महानाट्य दाखवायचं ठरवलं आहे. तरुणाईपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी कोल्हापुरातले अनेक दानशूर लोक पुढे येतात ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. कारण, माझ्या लेकरांनी हे बघितलं पाहिजे तसंच ज्यांना ते शक्य नाही त्या लेकरांनाही तो इतिहास कळला पाहिजे ही भावना खूप मोठी आहे.

कोल्हापुरात या आधीही तुम्ही महानाट्याचे प्रयोग केले होते. नाटकाच्या निमित्ताने, मालिकेच्या निमित्ताने तुमचा कोल्हापूरशी सतत संबंध आलाय. या निमित्तानं कोल्हापूरकरांविषयी काय सांगाल, त्यांना कोणता संदेश द्याल?

खवय्यांचं कोल्हापूर आहे, रसिकांचं कोल्हापूर आहे. कोल्हापूरकरांना इतिहास वेगळा सांगण्याची गरज नाही. कोल्हापूरच्या नसानसात हा इतिहास आहे. सर्व तरुणाईला मी एवढंच सांगेन, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली माती, माता आणि मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदानाची प्रेरणा अनुभवण्यासाठी हे महानाट्य बघायला या. मित्रांना घेऊन या, सहकुटुंब या आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजावर कोरून घ्या. मी समस्त कोल्हापूरकरांना एवढंच सांगेन की यायलाच लागतंय..!

Back to top button