कोल्हापूर : व्हिडीओ चित्रीकरणात 191 जणांनी दिली लेखी परीक्षा | पुढारी

कोल्हापूर : व्हिडीओ चित्रीकरणात 191 जणांनी दिली लेखी परीक्षा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर पोलिस दलातील रिक्त 24 जागांसाठी रविवारी चोख बंदोबस्तात लेखी परिक्षा पार पडली. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्हिडीओ चित्रीकरणात झालेल्या परीक्षेत 286 पैकी 191 उमेदवारांनी परीक्षा दिली. आठवड्यात अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

राज्यात सर्वत्र रविवारी एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोल्हापूर पोलिस दलात रिक्त 24 जागांसाठी 286 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 191 उमेदवार लेखी परीक्षेसाठी उपस्थित होते. बायोमेट्रिक हजेरीद्वारे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येत होता. सकाळी साडेआठ ते दहा या काळात परीक्षा झाली.

परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणतालिका सोमवारी (दि.3) पोलिस मुख्यालयासह संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. उमेदवारांचे काही आक्षेप असतील तर त्याची पडताळणी करून आठवड्यात शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेतील गुणांची अंतिम गुणतालिका तयार केली जाणार आहे, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या 24 उमेदवारांची यादी जाहीर होईल, असेही ते म्हणाले.

Back to top button