नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता; कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य | पुढारी

नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता; कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नथुराम गोडसे यांच्याविषयी जितके वाचाल तितके तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, त्या महात्म्याला प्रणाम, असे सांगत, ते जर नसते तर देशाचा नाश झाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी शनिवारी कोल्हापुरात केले. त्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

पलूस (जि. सांगली) येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी कालीचरण महाराज कोल्हापुरात आले होते. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. अंबामातेची संपूर्ण भारतावर कृपा व्हावी. भारतमाता ही सोन्याची चिडिया बनावी. सगळे हिंदू श्रीमंत व्हावेत, अशी प्रार्थना करण्यासाठी आपण आज अंबामातेच्या दर्शनाला आल्याचे कालीचरण महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राहुल गांधींच्या वक्तव्यांविषयी त्यांना विचारता, प्रमाण नसताना कोणालाही कोणीही चोर म्हणत असेल, तर तो अपराधच आहे. ज्यांनी हिंदुत्व हितासाठी प्रयत्न केले, ते लोक यांना शत्रूच वाटतात. हिंदू व्होटर्स राहुल गांधींच्या व्होटर बँकेचे शत्रू ठरतात, असे सांगत अन्याय, अत्याचार सहन करण्यासाठी आता हिंदू शेळपट राहिलेला नाही. तो संघटित होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदू एकवटल्याचे ते म्हणाले.

देशात विशिष्ट समाज दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या हातूनच अशा दंगली घडवल्या जातात. प्रत्येक दंगल ही नियोजनपूर्व घडवली जाते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जयेश कदम, संजय कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम,अमोल ढणाल, सचिन तोडकर, उदय कदम आदी उपस्थित होते. वादग्रस्त वक्तव्य करताच उपस्थित शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले तेथून निघून गेले.

Back to top button