मैदान संपलेले नाही; आता तर सुरुवात : अमल महाडिक | पुढारी

मैदान संपलेले नाही; आता तर सुरुवात : अमल महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  आम्ही मैदानातच आहोत. मैदान संपलेलं नाही, ही आता फक्त सुरुवात आहे. मग आताच एवढा आकांडतांडव कशाला? असा खडा सवाल करीत मग्रुरीची भाषा ‘राजाराम’चे सभासद सहन करणार नाहीत, असा इशारा माजी आमदार अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना बुधवारी दिला.

राजाराम कारखान्यासाठी दाखल केलेल्या विरोधी आघाडीच्या 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यावेळी बोलताना महाडिक म्हणाले, या 29 उमेदवारांवर पोटनियमातील तरतुदीनुसार हरकत घेतल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. याचाच धक्का बसल्याने विरोधकांनी थेट निवडणूक यंत्रणेवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. महाडिक द्वेषातून विरोधक आता निवडणूक यंत्रणेलाही बदनाम करू लागले आहेत, असा आरोप करीत महाडिक म्हणाले, अवैध ठरविलेल्या 29 लोकांसाठी विरोधकांचा जळफळाट होत आहे; पण 1899 सभासदांना अवैध ठरवण्याचा प्रयत्न करताना आपुलकीची भावना जागी झाली नव्हती. या सभासदांवर आक्षेप घेतला तोच खरा काळा दिवस होता, असा हल्लाही त्यांनी चढविला.

निवडणुकीसाठी 198 उमेदवारी अर्ज आहेत. यातून सक्षम पॅनेल तयार करत त्यांनी मैदानात उतरावं. उर्वरित उमेदवारांवर त्यांचा विश्वास नाही काय? ते उमेदवार निवडणुकीसाठी सक्षम नाहीत काय? हे त्यांनी जाहीर करावे. मग्रुरीची भाषा सहन करायला ते डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सभासद नाहीत, हे धमक्या देणार्‍या विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही महाडिक यांनी दिला.

विरोधक विचलित

विचलित झालेले विरोधक रागाने धमक्या देऊ लागले आहे. परंतु, मग्रुरीची भाषा सहन करायला हा डी. वाय. पाटील साखर कारखाना नाही. 122 गावांतील सभासदांच्या मालकीचा राजाराम कारखाना आहे, असेही महाडिक यांनी म्हटले आहे.

Back to top button