कोरोना औषधांचा खप घटला; २५१९५ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला नाही | पुढारी

कोरोना औषधांचा खप घटला; २५१९५ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला नाही

कोल्हापूर; एकनाथ नाईक : जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत रुग्णांची संख्या मोठी होती. औषधे, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना वेटिंगवर थांबावे लागले. आता मात्र कोरोनाचा कहर कमी झाला आहे. सर्दी, घसादुखी, खोकला, तापावरील गोळ्या औषधांची विक्री कमी झाली आहे. अत्यावश्यक समजले जाणारे रेमडेसिविरची मागणीही घटली असून मुबलक साठा उपलब्ध आहे. ऑक्सिमीटर, थर्मामीटर गण, व्हेंंटिलेटर यांना विश्रांती मिळाली आहे. मे ते जुलैअखेर हाऊसफुल्ल असणार्‍या सरकारी, खासगी रुग्णालयांतही आता बेड उपलब्ध आहेत. नॉन कोरोना रुग्णांवर शासकीयसह खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मे ते जुलै 2021 मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची स्थिती गंभीर होती. कोरोनाचा सर्वाधिक फैलाव याच काळात अधिक झाला. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली होती. रुग्णांना बेड मिळेना, ऑक्सिजन मिळेना आणि गरज असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना मृत्यू झाला. तर काहींचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाले. रुग्णालयात अ‍ॅडमिट करायलाही जागा नसल्याने अनेक रुग्ण दगावले. असे भीषण वास्तव कोल्हापुरात पाहायला मिळाले. अनेक चालती-बोलती माणसं बघता बघता निघून गेली.

कोरोनावर प्रभावी समजल्या जाणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रात्र जागून काढण्याची वेळ नातेवाईकांवर आली. त्यामुळे या इंजेक्शनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. सरकारी यंत्रणेने खरेदी केलेल्या अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना संसर्गाची तीव—ता कमी होत गेली. त्यामुळे घसादुखीमुळे होणार्‍या संसर्ग तसेच तापाच्या गोळ्यांच्या खपातही घट झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी कमी होत आहे. तसा औषधांचा खप कमी होत आहे. औषधांची मागणी 98 टक्यांहून कमी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 6 हजार 321 बाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी 2 लाख 265 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 5 हजार 784 जणांचा आतापर्यंत मृत्यू ओढावला आहे. तर 272 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Back to top button