वनस्पतीजन्य रंगांच्या साखरमाळांनी वाढणार गुढीची गोडी | पुढारी

वनस्पतीजन्य रंगांच्या साखरमाळांनी वाढणार गुढीची गोडी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  बीट, बेल, बहावा, कढीपत्ता, हळद, पुदिना, शेंद्री, पारिजातक, गोकर्ण या वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांपासून साखरेच्या माळांमुळे गुढीची गोडी आणखी वाढणार आहे. दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्ग मित्र परिवारातर्फे कसबा बावडा येथे प्रात्यक्षिकांतून महिलांना पर्यावरणपूरक रंगांपासून साखरेच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
साखरेच्या माळा बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. मात्र या रंगांबाबत बाजारात नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. यासाठी अशा माळा वनस्पतीजन्य रंगांपासून बनविण्यासाठी निसर्गमित्र परिवार प्रात्यक्षिके घेत आहे. महिला बचत गटांना अशा माळा बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या उपस्थितीत राणिता चौगुले यांनी कसबा बावडा येथे ही प्रात्यक्षिके घेतली.

गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाचे आरोग्यदायी उपयोग महिलांना सांगून कडुलिंबाचे रोप गुढी सोबतच दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे. फुले, निर्माल्यापासून मिळणार्‍या वनस्पतीजन्य रंगांचा उपयोग लग्न कार्यातील अक्षतांचे तांदूळ रंगविणे, रांगोळी, हळद खेळण्याकरिता वापरावे असे आवाहनही या कार्यशाळेत करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक मेघा पाटील यांनी केले. आभार अस्मिता चौगुले यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन पराग केमकर, जयश्री सुर्वे, रूपाली परीट, कस्तुरी जाधव, वैष्णवी गवळी यांनी केले.

ओंजळभर फुले द्या, साखरेची माळ घेऊन जा…

निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ‘ओंजळभर फुलं द्या आणि साखरेची माळ घेऊन जा’ अशी मोहीम गुढीपाडव्यापासून राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी निसर्ग मित्र संस्था, 2823 बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्था कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले.

Back to top button