कोल्हापूर : तिर्थक्षेत्र मेतके प्रतिशिर्डी होईल! मूळक्षेत्र मेतके यात्रेत नाथांची भाकणूक | पुढारी

कोल्हापूर : तिर्थक्षेत्र मेतके प्रतिशिर्डी होईल! मूळक्षेत्र मेतके यात्रेत नाथांची भाकणूक

हमीदवाडा; पुढारी वृत्तसेवा : मेतके तिर्थक्षेत्राचा महिमा वाढेल ते प्रतिशिर्डी होईल, देशात समान नागरी कायदा येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन फुलेल, शर्यतीचा बसव्या (बैल) शाप देईल अशी महत्वपूर्ण भाकिते मूळक्षेत्र मेतके करण्यात आली. मेतके येथील भंडारा महोत्सवात झालेल्या नाथांच्या भाकणुकीत झाली. श्री. हालसिध्दनाथ व बाळूमामा यांच्या या भंडारा महोत्सवाची सांगता भाकणुक व महाप्रसादाने झाली.

श्री.हालसिध्दनाथ- बाळूमामा मंदिरात पहाटे ही भाकणूक झाली ही भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भगवान डोणे-वाघापुरे यांनी ही भाकणूक केली. यावेळी झालेली भाकिते अशी; पिवळ्या भस्माचा महिमा वाढेल, कडधान्य उदंड पिकेल, दीड महिन्याचे धान्य पिकेल, वैरण सोन्याची होईल, पाकिस्तानचा चौथाई भाग भारतात येईल, मेंढीचा भाव लाखाच्या घरात खेळेल, साखरेचा भाव तेजीत राहील, गुळाचा भाव वाढेल, तंबाखूची पेंढी मध्यम पिकेल पण तंबाखूने रोगराई वाढेल, ऊसासाठी मोठी आंदोलने होतील, पाण्याचा कप विकत मिळेल, चालता बोलता मृत्यू होईल व उशाची भाकरी उशाला राहील, आपली जागा साडेतीन हातच आहे हे लक्षात ठेवा, कोल्हापूरची अंबाबाई बाळूमामाला भेटायला येईल, कर्नाटक राज्यात धरणाला भगदाड पडेल, डेरीचा मॅनेजर मलई खात राहील व दुध घालणारा शेतकरी कर्जातच राहील, दागिने पैसा घातक ठरेल, बारा महिने लग्नकार्य चालेल, नात्याला कलंक लागेल. जगात डोंगराएवढे पाप व दोऱ्याएवढे पुण्य झालंय.

ज्ञानेश्वरी पारायण सांगता,काल्याचे किर्तन व त्यानंत महाप्रसाद आयोजित केला होता. सायंकाळी दिंडी काढण्यात आली. यात्रेसाठी मुरगुड पोलीस व स्वराज्य रेस्क्यु फोर्स बिद्री यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Back to top button