हातकणंगले तालुक्याचे होणार विभाजन? | पुढारी

हातकणंगले तालुक्याचे होणार विभाजन?

हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : मोठ्या तालुक्यांचे विभाजन आणि नवीन तालुका निर्मितीसाठी सुधारित निकषा करीता कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात विभागीय आयुक्तांची समिती गठीत केली आहे. प्रस्तावित तालुक्यांचा अभ्यास करून ही समिती सहा महिन्यात शासनाला अहवाल सादर करणार आहे. पेठवडगावलाही स्वतंत्र तालुका करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत.

इचलकरंजीकरांची स्वतंत्र तालुक्यासाठी पूर्वीपासून आग्रह आहे. परंतु राजर्षी शाहू महाराजांनी निर्मीत केलेल्या व सर्वसोयीनियुक्त असलेल्या हातकणंगलेचे विभाजन होवू न देण्यासाठी हातकणंगलेकरांनी पवित्रा घेतल्यामुळे हातकणंगले विभाजन हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.

पूर्वाश्रमीचा पेठा विभाग म्हणून आळते गावाची प्रचिती होती. परंतु राजर्षि शाहू महाराजांनी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा असलेल्या हातकणंगले गावाला तालुक्याचा दर्जा दिला होता. जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका अडीच ब्लॉकचा तालूका असून निलेवाडीपासून-हुपरी रेंदाळपर्यंत व शिरोलीपासून ते खोचीपर्यंत तालुक्याचा विस्तार आहे. तालूक्याच्या चारी दिशेनी हातकणंगलेला येण्यासाठी दळणवळणाची सोय आहे. याशिवाय इतिहासकालीन इमारतीबरोबरच करोडो रुपये खर्चून तहसीलदार कार्यालय व पंचायत समीतीकरीता प्रशासकीय इमारती पूर्णत्वास आल्या आहेत.

हातकणंगले विभाजनाचा बसलेला धुरळा पेठ वडगांव मध्ये तालूका विभाजन कृती समीती गठीत झाल्याने पुन्हा उडू लागला होता. कृती समीतीच्या मते हातकणंगले तालूक्याच्या उत्तरेकडील गावाना तसेच सांगली कोल्हापूर रस्त्याच्या उत्तरेकडील गावांना सोयीच ठिकाण म्हणून वडगांव शहराची तालूका म्हणून निर्मीती करावी अशी अपेक्षा आहे. परंतु याकरीता शासनाचा कोट्यावधी रुपये खर्ची पडणार आहे हे वास्तव आहे. तालूका विभाजन कृती समितीचे नूतन अध्यक्ष गुलाबराव पोळ यांच्या नेतृत्वाखाली अगोदरपासूनच कृती समीती गठीत आहे. याशिवाय इचलकरंजी शहरालाही तालूक्याची आवश्यकता असल्याने या ठिकाणी अपर तहसिलदार कार्यालये आणि नवीन तलाठी सज्जे, मंडल कार्यालये स्थापन झाली आहेत. समिती गठीत केल्याने हातकणंगले तालूक्याचे विभाजन होणार काय असा प्रश्न आहे.

हातकणंगले सर्वांसाठी मध्यवर्ती ठिकाण

सांगली – कोल्हापूर महामार्गासह मध्यवर्ती ठिकाण, रेल्वे, प्रशासकीय इमारतीचे पूर्ण झालेले बांधकाम, दळण-वळणाकरिता सोयीस्कर अशी रचना शाहूकालीन असताना कोणाच्या स्वार्थासाठी हा प्रकार सुरू आहे, असा सवाल हातकणंगलेचे नागरिक करीत आहेत. तालुका बचावासाठी पक्ष, संघटनाविरहित समिती स्थापन करून लढा उभा केला आहे. तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून प्रशासकीय इमारती बांधल्या आहेत. अनेक दळणवळणासह अनेक सोयींनी युक्त असलेल्या तालुक्याचे विभाजन होऊ नये, असे जाणकारांचे मत आहे.

Back to top button