कोल्हापूर : ऊसगाळपात कोल्हापूर अव्वल | पुढारी

कोल्हापूर : ऊसगाळपात कोल्हापूर अव्वल

कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. फेब्रुवारी अखेर पाहिले तर राज्यात 959 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून 951.75 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनाचा सरासरी विचार करता आठ लाख क्विंटल साखर उत्पादन घटले आहे.

राज्यात एकूण साखर उतारा 9.91 टक्के आहे. कोल्हापूर विभाग ऊस गाळप आणि साखर उतार्‍यात राज्यात प्रथम क्रमांकावर असून साखर उतारा 11.41 टक्के इतका आहे. तर नागपूर विभागाचा 7.43 टक्के साखर उतारा आहे.

चालू गळीत हंगामात राज्यात 102 सहकारी आणि 102 खासगी अशा 204 कारखान्यांनी हंगाम सुरू केला. गतवर्षी 193 कारखाने सुरू झाले होते. पण त्यामध्ये 11 कारखान्यांची भर पडली आहे. हंगाम सुरू होऊन चार महिने पूर्ण झाली आहेत. यावर्षी काळपासाठी साधारणपणे 1100 ते 1200 लाख मेट्रिक टन ऊस मिळेल, असा अंदाज आहे. सध्या उपलब्ध उसाची आकडेवारी पाहता कारखाने आणखी 15 दिवस चालतील, अशी शक्यता आहे.

कोल्हापूर विभागातील खासगी आणि सहकारी अशा 36 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. फेब—ुवारी अखेर 219.18 लाख टन गाळप झाले. यातून 250.15 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. उतारा 11.41 टक्के आहे.

कारखाने बंद

कोल्हापूर विभागातील 5 साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम थांबवला आहे. तर, सोलापूरमधील 13, पुणे 2, अहमदनगर 3, नांदेड 2 असे 25 कारखाने बंद झाले आहेत.

Back to top button