ए. एस. ट्रेडर्ससह 12 कंपन्यांची सव्वापाच कोटींची रक्कम गोठविली | पुढारी

ए. एस. ट्रेडर्ससह 12 कंपन्यांची सव्वापाच कोटींची रक्कम गोठविली

कोल्हापूर : दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी शाहूपुरी येथील वादग्रस्त ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीसह संलग्न 12 कंपन्यांच्या खात्यावरील पाच कोटी 27 लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. तपास अधिकार्‍यांच्या पत्र व्यवहारानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, फरार संचालक व एजंटांना लुकआऊटची नोटीस जारी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दामदुप्पट रकमेची भुरळ घालून महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह सात राज्यांतील लाखांवर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार ( रा. किर्लोस्करवाडी रोड, पलूस, सांगली), मुख्य व्यवस्थापक विजय जोतिराम पाटील (शिंदेवाडी, खुपिरे, ता. करवीर), बाबुराव किसन हजारे (विद्यानगर, कोल्हापूर), भिकाजी कुंभार (माळ्याची शिरोली, करवीर) यांच्यासह 27 जणांविरुद्ध नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदारसह संचालक व एजंटांनी शाहूपुरी परिसर व ग्रामीण भागातील कार्यालयांना टाळे ठोकून पलायन केले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला. तरीही संशयित पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. संशयितांच्या अटकेसाठी गुंतवणूकदारांकडून तगादा असतानाही तपास यंत्रणांच्या हालचाली कासव गतीनेे सुरू आहेत.

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीशी संलग्न 12 कंपन्यांच्या विविध बँकांतील उलाढालीची माहिती घेतली. त्यानुसार कंपन्यांची विविध बँकांतील पाच कोटी 27 लाखांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

फॉरेन्सिक ऑडिटला अप्पर महासंचालकांची मंजुरी

ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याच्या निर्णयाला अप्पर पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा) यांनी मंजुरी दिली आहे. फॉरेन्सिक ऑडिटद्वारे आर्थिक व्यवहारातील अनियमितता चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. 200 गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून त्यांची सहा कोटी 50 लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

सेमिनारसह गिफ्टवर कोट्यवधींची उधळण

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोल्हापूर, पुण्यांसह महाबळेश्वर, गोवा येथील काही आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या सेमिनारवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आल्याची माहिती चौकशीतून पुढे येत आहे. संबंधित हॉटेल्सची नावेही रेकॉर्डवर आली आहेत. तेथील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Back to top button