विधिमंडळ कार्यालय उद्धव ठाकरेंच्याही मालकीचे नाही : दीपक केसरकर | पुढारी

विधिमंडळ कार्यालय उद्धव ठाकरेंच्याही मालकीचे नाही : दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही पक्षाचे विधिमंडळ कार्यालय हे त्या पक्षाचे नव्हे, तर सरकारचे असते. ते कोणाच्याच मालकीचे नसते. शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालयही उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. दररोज बेताल वक्तव्ये करणार्‍या संजय राऊत यांचा जामीन रद्द करा, अशी मागणीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

विधिमंडळ कार्यालयानंतर आता शिवालयावरही ताबा घेणार का, असे विचारता, सतत सहानुभूती मिळावी म्हणून हेच लोक काहीही सांगत असतात. आम्ही कोणावरही मालकी सांगितलेली नाही, सांगणार नाही. असा कसलाही ताबा घेणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांना केवळ बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेनेला बांधले होते. ती पाचव्या क्रमांकावर गेली होती. शिंदे यांनी ती मोठ्या मेहनतीने दुसर्‍या क्रमांकावर आणली, असेही केसरकर यांनी सांगितले.

बाळासाहेबांनी 1999 ला जे अधिकार सर्वसामान्य शिवसैनिकांना दिले होते, ते सर्वाधिकार 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे घेतले. ते निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले नाहीत. हे अधिकार परत मिळवण्यासाठी ही लढाई आहे, असे सांगत राऊत म्हणजे उद्धव यांच्या शेजारी बसलेला राक्षस आहे, अशा शब्दांत केसरकर यांनी हल्ला चढवला.

Back to top button