हुपरी : कापसापासून साकारलेली शिवलिंगाची प्रतिकृती दर्शनासाठी खुली | पुढारी

हुपरी : कापसापासून साकारलेली शिवलिंगाची प्रतिकृती दर्शनासाठी खुली

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : हुपरी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त कापसापासून बनविण्यात आलेल्या आठ फुटी शिवलिंगाची प्रतिकृती दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. कापसाच्याच पणत्यांनी ती प्रतिकृती सजविण्यात आली आहे. त्यातून लेझर किरणांद्वारे सर्व भक्तांना प्रभुमिलनाची, मन: शांतीची आत्मानुभूती पाहायला मिळत आहे. ‘अजन्माचा जन्मोत्सव – महाशिवरात्री महोत्सव’ सर्वश्रेष्ठ जयंती म्हणजे, महाशिवरात्री होय. असे मत बी. के. सुनिता (संचालिका, हुपरी सेवाकेंद्र) यांनी केले.

परमात्मा शिव असे निराकार ज्योतिस्वरूप असून या कलियुगाच्या अज्ञान, अराजकता, अनैतिकतेच्या घोर रात्रीमध्ये प्रजापिता ब्रह्माच्या साकार तनामध्ये अवतरित होतात. म्हणजेच त्यांचा दिव्य जन्म होतो. आणि या घोर आपल्या ज्ञानप्रकाशाच्या दिव्य किरणांनी समस्त सृष्टीवरचा अज्ञानाचा, विकारांचा समूळ नाश करतात आणि पुनःश्च या भुतलावर १००% सुख- शांती आणि पवित्रतेनी नटलेली सुंदर स्वर्णिम दुनियेचा उष:काल करतात. परमात्मा शिव ज्ञान, प्रेम, आनंद, पवित्रता, सुख, शांती आणि शक्तीचे सागर आहेत, असे विचार सुनीता दीदी यांनी व्यक्त केले. शिवस्मरणाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन सम्राज्ञी यांच्या नृत्याने स्वागत झाले.

यावेळी आण्णासाहेब शेंडुरे, डॉ. शिशिर रुद्राक्षी, रेवती पाटील, फादर इकबाल काटकर, अरुण महाजन, गणेश वाईगडे उपस्थित होते. विद्यालयातील बहेनजी भाई आदी सेवेकरी यांच्या अथक परिश्रमातून ही प्रतिकृती साकारली असून ती दर्शनासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत खुली करण्यात आली आहे. प्रतिकृतीच्या दर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सुनीता दीदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. संतोषी बहन यांनी केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button