केंद्रीय गृहमंत्र्यांची पत्नी सोनल शहा आज कोल्हापुरात | पुढारी

केंद्रीय गृहमंत्र्यांची पत्नी सोनल शहा आज कोल्हापुरात

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : निसर्गाच्या रचनेमध्ये मानवाला दोन पाय दिले असले, तरी स्वप्नांना मात्र अनेक पंख दिले आहेत. या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी पंखांद्वारे मानव गगनभरारी घेता, पण अशी मोठी झेप घेतल्यानंतर त्याची जमिनीशी नाळ काही तुटत नाही. आकाशात विहार करतानाही त्याचे लक्ष मनाच्या कुपीतील आठवणींमध्ये गुंतून राहाते. मग पहिली शाळा, गुरूजन, शाळेचे सवंगडी विसरत नाहीत. तसा मातीचा सुगंधही विसरत नाही. अशाच एका आठवणीची कुपी रविवारी उलगडली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल यांनी आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे जिथे गिरविले, त्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवी समारंभात सोनल आपल्या पतीसोबत उपस्थित राहून गुरूकुलावर कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.

हा दिवस सोनल यांच्यासाठी भाग्याचा तर आहेच; पण कोल्हापूरच्या शिक्षण विश्वामध्ये ज्या संस्थेने हजारो बुद्धिवान विद्यार्थ्यांची फौज देशाला अर्पण केली, तिच्यासाठी तर ही अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी आहे. कोल्हापूरच्या समाजजीवनामध्ये 1940 च्या दशकात गुजरातमधील पिलवाई येथून उदरनिर्वाहाच्या शोधार्थ एक कुटुंब कोल्हापूरच्या आश्रयाला आले होते. कांतिलाल शहा आपल्या भावंडांसह कोल्हापुरात दाखल झाले आणि सध्याच्या वालावलकर कापड दुकानासमोरील जागेमध्ये त्यांनी मसाल्याच्या पदार्थांची पेढी सुरू केली. या पेढीतील सुंदरभाई शहा यांची कनिष्ठ कन्या म्हणजे सोनल आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुविद्य पत्नी.

प्रारंभीच्या काळात वालावलकर दुकानाच्या माडीवर अत्यंत साध्या घरामध्ये हे कुटुंब राहात होते. पुढे व्यवसायवृद्धीने लक्ष्मी रोडला म्हणजेच महापालिकेसमोर घनःश्याम कांतिलाल या नावाने ही पेढी सुरू झाली आणि बघता बघता गेल्या 80 वर्षांमध्ये कोल्हापूरकरांच्या विश्वासाची साक्षीदार ठरली. या कुटुंबातील सोनल यांचे शिक्षण न्यू एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले. याच शाळेत त्यांना चंद्रलेखा जैन, सविता यादव, आशा पंजवानी, सुलभा लिमये, गीता वाली अशा सवंगडी मिळाल्या. त्याचबरोबर कदम, यवतकर, आठल्ये, साळोखे अशा शिक्षिकांनीही त्यांच्या शिक्षणाचा वेलू चढविण्यास मोलाची कामगिरी केली.

थोडा खट्याळ, शांत आणि मितभाषी स्वभावाच्या सोनल शहा यांच्याविषयी त्यांच्या मैत्रिणींना बोलते करण्याचा प्रयत्न केला, की आठवणींचे भांडार अलगदपणे खुले होण्यास सुरुवात होते. पुष्पा कदमबाईंवर तर सोनल यांचा मोठा लोभ. काही वर्षांपूर्वी याच संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोनल येणार कळल्यानंतर कदमबाई आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. पद्माराजे शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉमर्स कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला आणि वयाच्या 20 व्या वर्षी त्या अमित शहा यांच्या सहचारिणी बनून अहमदाबादवासी झाल्या.

कोल्हापूरचा रंकाळा, राजाभाऊंची भेळ, पाणीपुरीचा गाडा अन्…

सोनल शहा यांचे पुत्र आणि बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शहा यांचा जन्मही कोल्हापूरचाच. डॉ. वि. ह. वझे यांच्या दवाखान्यात त्यांनी पुत्ररत्नाला जन्म दिला. सोनल शहा यांची आठवणीची कुपी किती समृद्ध पहा. काही वर्षांपूर्वीच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात डॉ. वझे यांच्या पत्नी मीनल व प्रसूतीवेळी शुश्रुषा करणार्‍या छत्रे सिस्टर यांचाही त्यांनी भेटून सन्मान केला होता. कोल्हापूरचा रंकाळा, राजाभाऊंची भेळ, पाणीपुरीचा गाडा आणि मर्यादित चित्रपटगृहे, मैत्रिणींचा गोतावळा, शिक्षकांच्या आठवणी या सार्‍या गोष्टी जशा त्यांच्या आठवणींच्या कुपीत आजही घर करून आहेत. त्याहीपेक्षा कोल्हापूरच्या अंबाबाईवर सोनल व अमित शहा या दाम्पत्याची अपार श्रद्धा आहे.

Back to top button