राज्यपालांच्या दौर्‍याच्या निषेधार्थ 16 रोजी कोल्हापूर बंदचा इशारा | पुढारी

राज्यपालांच्या दौर्‍याच्या निषेधार्थ 16 रोजी कोल्हापूर बंदचा इशारा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महामानवांचा अपमान करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहू नये. तसे केल्यास 16 फेब्रुवारीस कोल्हापूर बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीच्या (भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्ष वगळता) बैठकीत शनिवारी घेण्यात आला. सोमवारी (दि. 13) शिवाजी विद्यापीठासमोर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या विरोधात निदर्शने करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 16 फेब्रुवारीला विद्यापीठाच्या प्रागंणात होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभाला राज्यपाल कोश्यारी उपस्थित राहणार असल्याने कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात बैठक बोलवण्यात आली.

यावेळी बोलताना आर. के. पोवार, बाबा पार्टे म्हणाले, महापुरुषांचा अपमान करणार्‍या राज्यपाल कोश्यारी यांना शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला कुलगुररू डॉ. डी. टी. शिर्के यांनी निमंत्रित करण्याची गरज नव्हती. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले व माफीही मागितली नाही. अशा राज्यपालांना निमंत्रित करून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत राज्यपाल कोश्यारी यांना कोल्हापुरात येऊ दिले जाणार नाही. आलेच तर दीक्षांत समारंभ स्थळावर ‘पायताण मारो’ मोर्चा काढण्यात येईल व 16 रोजी कोल्हापूर बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांनी कोल्हापुरात येऊनच दाखवावे. त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कोणाच्या सांगण्यावरून राज्यपाल यांना निमंत्रित केले याचा खुलासा करावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार हे माहीत असूनही जर राज्यपाल येणार असतील तर कोल्हापुरी पायताण दाखवून राज्यपाल यांचा निषेध केला जाईल, असे सांगितले.

बाबा इंदुलकर म्हणाले, महापुरुषांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अपमानास्पद वक्तव्य करत आहेत हे माहीत असताना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी त्यांना दीक्षांत समारंभाला निमंत्रित करणे योग्य नाही. त्यामुळे कुलगुरू डॉ. शिर्के यांचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी विद्यापीठासमोर जमावे, तसेच विद्यार्थ्यांनी या दीक्षांत समारंभावर बहिष्कार घालावा, असे आवाहन केले. अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा दौराच रद्द झाला पाहिजे, असे आंदोलन येत्या चार दिवसांत हाती घ्यावे, असे सांगितले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी कोल्हापूर बंदला पाठिंबा देत रविवारी सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीची बैठक नाथा गोळे तालीम येथे होणार असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.

यावेळी शेकापचे भाई कदम, प्रा. टी. एस. पाटील, सुभाष देसाई, हर्षल सुर्वे, किसन कल्याणकर, कादर मलबारी, जयकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला संभाजीराव जगदाळे, प्रा. सुभाष जाधव, अशोक भंडारे, बबनराव रानगे, अवधूत पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button