कोल्हापूर : पतीचा खून; पत्नीसह आठ मारेकर्‍यांना जन्मठेप | पुढारी

कोल्हापूर : पतीचा खून; पत्नीसह आठ मारेकर्‍यांना जन्मठेप

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  अनैतिक संबंधांना अडसर ठरणार्‍या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराकरवी मारेकर्‍यांना दीड लाखाची सुपारी देऊन अपहरण व धडापासून शिर वेगळे करून अमानुष हत्या करणार्‍या प्रेयसीसह आठजणांना न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले. मुख्य संशयित लीना नितीन पडवळे, प्रियकर रवी रमेश मानेसह साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

12 जानेवारी 2011 रोजी घडलेल्या या क्रूर हत्येचा 12 वर्षांनंतर निकाल लागला. मारेकरी मूळचे कोल्हापूरचे आहेत. निकाल घोषित होताच नातेवाईकांनी न्यायालयासह शासकीय रुग्णालय आवारात प्रचंड गर्दी केल्याने तणाव होता. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या नितीन बाबासाहेब पडवळे (45, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सुरू होती. खटल्यात सरकारी पक्षामार्फत सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. समीउल्ला पाटील यांनी काम पाहिले.

खटला सुरू असतानाच सुपारी बहाद्दराचा खून

खुनासाठी दीड लाखाची सुपारी घेणार्‍या अमित चंद्रसेन शिंदे (32, रा. विक्रमनगर व्यायाम शाळेजवळ) याचा खटल्याचे कामकाज सुरू असतानाच गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे खून झाला होता; तर सतीश भीमसिंग वडर (रा. पाथरवट गल्ली, सायबर चौक), इंद्रजित ऊर्फ चिल्या रमेश बनसोडे (रा. फ—ेडस कॉलनी, कावळा नाका) हे दोघे अद्यापही फरारी आहेत.

आर.के.नगर येथून केले अपहरण

दि. 12 जानेवारी 2011 रोजी विशाळगड (ता. शाहूवाडी) येथील मानोली गावालगत वाघझरा जंगलात निर्जन ठिकाणी ही क्रूर घटना घडली. मारेकर्‍यांनी नितीन पडवळे याला कोल्हापूर येथील आर.के.नगर खडीचा गणपती येथे बोलावून घेऊन तेथे बेदम मारहाण केली. तेथून अपहरण करून वाघझरा जंगलात नेऊन अमित शिंदे याने चॉपरने नितीनचा गळा चिरला आणि शिर धडापासून वेगळे केले. शरीराचा संपूर्ण भाग खोल दरीत फेकून दिला; तर मुंडके प्लास्टिकच्या पिशवीत घालून वारणानगर (ता. पन्हाळा) येथे आणून सुपारी देणार्‍या रवी मानेला दाखविले होते, अशीही धक्कादायक माहिती शाहूवाडी पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाली होती.

खटल्याची पार्श्वभूमी

खून झालेल्या नितीन पडवळे याची लीना पडवळे ही दुसरी पत्नी होय, तर गीतांजली मेनशी लीनाची विश्वासू मैत्रीण. मुख्य आरोपी रवी माने याचे या घटनेआधी लीनाबरोबर पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. दोघेही एकमेकांना परस्पर भेटत होते. त्यांच्यातील अनैतिक संबंधांची पती नितीनला खबर लागली होती. त्यातून तो पत्नी लीनाला वारंवार मारहाण करून त्रास देत होता. शिवाय, घरातून बाहेर जाण्यास मज्जावही करत होता.

पतीच्या खुनासाठी प्रियकराला साकडे

लीनाने प्रियकर रवी माने याच्याशी संपर्क साधला. आपल्यातील अनैतिक संबंधांबाबत पतीला माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो सतत मानसिक त्रास देत आहे. मारहाण करीत आहे. अडसर दूर करण्यासाठी त्याला कायमचा संपविल्याशिवाय पर्याय नाही, असे लीनाने रवी याला सांगितले. त्यानुसार रवी याने दिलीप दुधाळे याच्या मध्यस्थीने अमित शिंदे याला नितीनच्या खुनासाठी दीड लाखाची सुपारी दिली.

हॉटेलमध्ये रचला खुनाचा कट

रवी माने याने खुनाच्या कटासाठी दि. 12 जानेवारीला दुपारी 12.30 वाजता शहरातील एका मध्यवर्ती परिसरातील हॉटेलमधील खोली भाड्याने घेऊन अन्य साथीदारांना बोलावून घेतले. तेथे नितीनच्या खुनाचा कट रचण्यात आला. गीतांजली मेनशी हिच्याशी संपर्क करून नितीन पडवळेला सायंकाळी खडीचा गणपती, आर.के.नगर परिसरात बोलावून घेण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

हात-पाय बांधून केले अपहरण

ठरल्या प्लॅनप्रमाणे गीतांजलीने नितीनला निश्चित ठिकाणी बोलावून घेतले. दोघे बोलत थांबलेले असतानाच विजय शिंदे, किशोर माने, आकाश वाघमारे, दिलीप दुधाळे, अमित शिंदे, सतीश वडर मोटारीतून आले. मोटारीतून उतरून अमितने पडवळेला मारहाण सुरू केली. बेसबॉल स्टीकने त्याच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या पडवळेचे हात-पाय बांधून त्याला जबरदस्तीने मोटारीत टाकले. तसेच त्याच्या अंगावरील दागिने काढून मुख्य आरोपीकडे देण्यात आले.

निर्जन ठिकाणी दरीत धड फेकले

पडवळेचे अपहरण करून त्यास वाठार, वारणानगर, कोडोली, बोरपाडळे, बांबवडे, मलकापूर, आंबामार्गे मानोली गावाजवळील वाघझरा जंगलातील निर्जन ठिकाणी नेण्यात आले. या ठिकाणी मोटारीतून पडवळेला खाली उतरविले. त्यानंतर दरीनजीक एका दगडावर पडवळेला बसवले. यावेळी अन्य साथीदारांनी त्याचे हात-पाय धरून ठेवले होते.

पिशवीतील शिर दाखवले!

अमित शिंदेने पडवळे याचे डोके काखेत धरून ठेवले. कंबरेचा चॉपर काढून पडवळेचा गळा चिरला. धडापासून शिर वेगळे केले. शिर प्लास्टिकच्या पिशवीत भरले, तर शरीराचा संपूर्ण भाग दरीत फेकून देण्यात आला. मारेकर्‍यांनी रवी माने याच्याशी संपर्क करून त्याला वारणानगर येथे येण्यास सांगितले. माने त्या ठिकाणी गेल्यानंतर अमित शिंदे याने प्लास्टिक पिशवीतील शिर दाखविले. यावेळी माने याने शिरासह अन्य साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या मारेकर्‍यांना सूचना केल्या. या थरारक घटनेनंतर मारेकर्‍यांनी पडवळेचे शिर, त्याची मोटारसायकल, रक्ताळलेला शर्ट, मोबाईल, कॅरीबॅग, बेसबॉल स्टीक वारणा नदीच्या पात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.

शिक्षा झालेले आरोपी

मुख्य आरोपी रवी रमेश माने (वय 37, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका), श्रीमती लीना नितीन पडवळे (42, रा. लाईन बाजार, कसबा बावडा), विजय रघुनाथ शिंदे (41, रा. नालासोपारा, जि. पालघर), किशोर दोडाप्पा माने (33, रा. साळोखे पार्क), आकाश ऊर्फ अक्षय सीताराम वाघमारे (30, रा. राजारामपुरी), दिलीप व्यंकटेश दुधाळे (39, रा. माकडवाला वसाहत), गीतांजली विरुपाक्ष मेनशी (40, रा. शांतीनगर, कोल्हापूर), महेश सबण्णा कुचकोरवी (41, रा. माकडवाला वसाहत) अशी जन्मठेप व प्रत्येकी
10 हजार रुपयांचा दंड ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.

21 साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्षी

सरकारी अभियोक्ता एस. एम. पाटील यांनी खटल्यात 21 साक्षीदार तपासले. सरकारी पक्षामार्फत साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. मुख्य संशयितांसह आठही जणांवरील खून,अपहरणाचा गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एस. घोगरे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. पोलिस भैरवी फारूख शेख यांनीही मोलाची कामगिरी बजावली.

नातेवाईकांचा आक्रोश

मुख्य आरोपी रवी मानेसह 8 जणांवरील आरोप सिद्ध झाल्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाईकांनी सायंकाळी न्यायसंकुल परिसरात मोठी गर्दी केली. आठजणांना जन्मठेप शिक्षा सुनावल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात बंदोबस्तात आणण्यात आले. रुग्णालय परिसरातही मोठा जमाव होता. खबरदारीसाठी पोलिसांनी रात्रीपर्यंत रुग्णालय परिसरात तळ ठोकला होता.

Back to top button